माथाडी कामगार कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा, फेक कामगारांना रोखण्यासाठी ठोस उपाय : कामगारमंत्री आकाश फुंडकर
आज विधिमंडळात कामगारमंत्री आकाश फुंडकर (Minister Akash Fundkar) यांनी माथाडी कामगार (Mathadi kamgar) कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणलेल्या नव्या विधेयकावर सखोल चर्चा घडवून आणली.
मुंबई : आज विधिमंडळात कामगारमंत्री आकाश फुंडकर (Minister Akash Fundkar) यांनी माथाडी कामगार (Mathadi kamgar) कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणलेल्या नव्या विधेयकावर सखोल चर्चा घडवून आणली. या चर्चेदरम्यान मंत्री फुंडकर यांनी कामगारांच्या समस्या आणि व्यावहारिक बाजू स्पष्ट करत विधेयकाच्या गरजेवर भर दिला. माथाडी कामगार समितीचा अभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात सुधारणा करणे अत्यावश्यक असल्याचे मत मंत्री फुंडकर यांनी व्यक्त केले.
प्रकरणे न्यायालयात अडकून राहिल्याने माथाडी कामगारांचं आर्थिक नुकसान
मागील सात वर्षांपासून समिती स्थापन न झाल्यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात गेली आणि प्रलंबित राहिली आहेत. अशी प्रकरणे न्यायालयात अडकून राहिल्याने कामगारांना किंवा माथाडींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. म्हणूनच, समितीच्या अभावात शासनाला निर्णय घेण्याचा अधिकार देणे आणि सहा महिन्यांत समिती स्थापण्याची सक्ती करणे ही तरतूद विधेयकात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
नेमका खरा माथाडी कोण? याचा उलगडा करणे ही काळाची गरज
फेक माथाडी आणि बनावट नावाने काम करणाऱ्या टोळ्यांचा वाढता धोका हा मोठा मुद्दा बनला आहे. त्यामुळं खऱ्या माथाडी कामगारांना त्याचा तोटा होत असून कायदा बदनाम होत आहे. या फेक माथाडी व्यवस्थेला रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने ठोस उपाय शोधणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आज 97700 माथाडी कार्यरत आहेत, तर तब्बल 2 लाख नोदणीकृत माथाडी आहेत. नेमका खरा माथाडी कोण? याचा उलगडा करणे ही काळाची गरज असल्याचे मंत्री फुंडकर म्हणाले.
माथाडी बोर्डाची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु
कामगार कायद्यातील ‘श्रम’ आणि ‘मजुरांच्या’ व्याख्यांवर काही सदस्यांनी हरकत नोंदवली. यावर बोलताना फुंडकर म्हणाले की, श्रमिक हा मेहनतीचाच पर्याय आहे, आणि दोन्ही गोष्टींच्या अर्थामध्ये तितकासा मोठा फरक नाही. मात्र या हरकतींचा आदर ठेवून सुधारित नियमावली तयार करताना सर्व सदस्यांचे सूचनाही विचारात घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी फुंडकर यांनी आश्वासन दिले की, "माथाडी बोर्डाची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी प्रस्ताव पाठवला गेला आहे. तसेच, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, आणि व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.
चळवळीतील भूमिका महत्त्वाची
स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या चळवळीची आठवण करुन देताना फुंडकर म्हणाले की, चळवळीतील कार्यकर्त्यांनी फेक माथाडी आणि गैरव्यवहारांविरोधात ठोस पुरावे आणि सूचना देणे आवश्यक आहे. चळवळीतील लोकांनी यामध्ये पुढाकार घेतल्यास कामगारांच्या हितासाठी प्रभावी ठरु शकते. मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, सध्या अधिकारीवर्गातील काही मालप्रॅक्टिसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. त्यामुळे कामगारांना न्याय मिळण्यास विलंब होत आहे. शासन याकडे गांभीर्याने लक्ष घालत आहे आणि यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्या या प्रस्तावित विधेयकामुळे कामगारांच्या समस्यांवर तोडगा निघू शकतो. व्यवस्थेमध्ये सुधारणा होऊ शकते. फेक माथाडींचा प्रश्न, माथाडी बोर्डाची रिक्त पदे भरने, आणि चेअरमनच्या नियुक्त्यांवर प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्धार यामुळे कामगारांच्या हिताला प्राधान्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
Shashikant Shinde : नरेंद्र पाटलांना मी सत्तेत बसवलं, आता माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील, उमेदवारी अर्ज भरताच शशिकांत शिंदेंची जोरदार टीका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

