खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजाला शिवसेनेची ऑफर, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत येण्याची खोतकरांची विनंती
भाजपने जे पेरले तेच आता उगवत आहे असा शिवसेना नेते खोतकरांनी आरोप केला.आता पंकजा मुंडे या ऑफर कडे कसं पाहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
![खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजाला शिवसेनेची ऑफर, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत येण्याची खोतकरांची विनंती Shivsena will be happy to welcome Pankaja Munde if she joins खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजाला शिवसेनेची ऑफर, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत येण्याची खोतकरांची विनंती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/21221646/web-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना: एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे स्पष्ट झाल्यावर माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. आज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावर भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होतोय, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्यामुळे पंकजा यांनी शिवसेनेत येण्याची विनंती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे. आता आवाहनाला पंकजा मुंडे कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर म्हणाले की, "भाजपने जे पेरले तेच आता उगवत आहे. मागच्या पाच वर्षात भाजपने मेगा भरती केली, आता भाजपला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते आज राष्ट्रवादी पक्षात जात आहेत. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आजही भारतीय जनता पक्षात अनेक प्रमुख नेते नाराज आहेत . त्यांनी त्यांच्या बुध्दीप्रमाणे निर्णय घ्यावा आणि पक्षांतर करावे. पंकजा मुंडे जर आमच्या पक्षात आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली आहेत. मी शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती करतो त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करावा. त्याच काय आणखी कोणी भाजप नेता जर आमच्या पक्षात आला तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू."
त्यानंतर राज्याचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनीही पंकजा मुंडे या आपल्या भगिनी आहेत आणि त्यांनी शिवसेनेत यावे, त्यांचे स्वागत आहे अशी प्रतिक्रिया दिली.
2014 साली राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असणारे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना पक्षांतर्गत धोबीपछाड देऊन फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षांतर्गत स्पर्धक असणाऱ्या एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे पंख छाटायला सुरवात केली.
मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने खडसेंप्रमाणे पंकजा मुंडेही नाराज होत्या. वेळोवेळी त्यांनी पक्षाला आपली नाराजी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांची बीडच्या राजकारणावर पक्कड मजबुत होती. पण त्यांची राजकीय ताकद कमी करण्यासाठी त्यांच्या विरोधकांना बळ देण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून करण्यात आला. ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी सुरू केलेली जलयुक्त शिवार योजनाही त्या परदेशी दौऱ्यावर गेल्या असताना त्यांना कोणतही पूर्वकल्पना न देता त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्यावर पंकजा यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण त्यावेळी पक्षातील काही नेत्यांनी त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले होते.
फडणवीस सरकार जाऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सत्तेत आले. त्यावेळी पंकजा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उध्दव ठाकरेंना जाहीर शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांनी पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची अनेकदा ऑफर दिली आहे.
गेल्या विधानसभा निवडणूकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर त्या पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्यांनी डिसेंबर 2019 साली आपल्या ट्विटरवरून भाजपचा उल्लेख काढला होता आणि गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमीत्त 12 डिसेंबर रोजी आपण मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितले होते. त्यावेळी त्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्याबाबतीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही तसे संकेत दिले होते.
पंकजा मुंडे या राज्यातील तसेच ओबीसी समाजातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांची बी़डच्या राजकारणावर पकड आहे. त्यांच्या भगिनी प्रितम मुंडे या भाजपच्या खासदार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)