Uddhav Thackeray in Irshalwadi: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज इर्शाळवाडी गावाला भेट देणार आहेत. ते ग्रामस्थांची आणि पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत. दुर्घटनाग्रस्तांना धीर देण्याचं काम उद्धव ठाकरे करणार आहेत. इर्शाळवाडीच्या (Irshalwadi) ग्रामस्थांची जवळच असलेल्या पंचायत मंदिरात ते भेट घेतील. दुर्घटना घडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी घटनास्थळाला भेट दिली होती, त्यानंतर आज उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला भेट देणार आहे. 


इर्शाळवाडीतील दुर्घटनेत (Irshalwadi Landslide) आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, या दुर्घटनेतील मृतकांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरड दुर्घटनेतून 119 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. प्रशासनाकडून दिवस-रात्र घटनास्थळी काम सुरु आहे. NDRF ची टीम अजूनही ढिगाऱ्याखालील मृतदेह काढण्यात व्यस्त आहे. मुसळधार पावसामुळे यात अडथळे येत आहेत. यातच आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.


ठाकरे गटाचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द


ठाकरे गटाकडून आज ठाण्यात उत्तर भारतीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, पण हा मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात ठाकरे गटाचा उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा उद्या पार पडणार होता. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात येणार होता, पण आता तो रद्द करण्यात आला आहे.


रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली, या घटनेमुळे ठाकरे गटाचा उत्तर भारतीय मेळावा रद्द करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी याबाबतची माहिती दिली. हा उत्तर भारतीय मेळावा आता पुढच्या आठवड्यात होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.


इर्शाळवाडी गावावर काळाचा घाला


मुंबई-पुणे महामार्गावर चौकजवळ मोरबे धरणाला लागून असलेला इर्शाळगड सर्वांचं लक्ष वेधून घेतो. मात्र बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. 


खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाला लागून असलेल्या डोंगरावरील या गावाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. गावात जाण्यासाठी रस्ता नाही, वीज देखील नाही, सौरऊर्जेच्या अपुऱ्या प्रकाशात गावाला दिवस काढावे लागत होते. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नसल्यामुळे पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेत टाकले जात होते.


हेही वाचा:


Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि बहुसंख्य लोक दरवर्षी तिथे का जातात? पाहा...