Irshalwadi Remot Sensing : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये घडलेली दुर्घटना सॉलिफ्लुक्षन ( solifluction) मुळे घडली असावी असं तज्ञांना वाटतंय. सोप्या शब्दात सांगायचे तर एखादा डोंगर जास्त तापतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी खूप पाऊस होतो, या कारणामुळे जमिनीची धूप होते, डोंगराचा काही भाग कमकुवत होतो, आणि त्यामुळेच डोंगराचा कमकुवत झालेला भाग खाली कोसळतो.. इर्शाळवाडीमध्ये नेमके असेच घडले असावे असा अंदाज महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटरच्या तज्ञांनी रिमोट सेंसिंग आणि 3 डी तंत्रज्ञानाच्या आधारावर व्यक्त केला आहे.... 


एबीपी माझाकडे इर्शाळवाडी परिसराचे एक्सक्लुझिव्ह सॅटॅलाइट थ्रीडी इमेजेस आहेत... त्याच्यातून दुर्घटना घडली त्या भागाची भौगोलिक रचना नेमकी कशी आहे.. हे समजून घेणे शक्य आहे... यासंदर्भात एबीपी माझा ने महाराष्ट्र सेन्सिंग एप्लीकेशन सेंटरचे वैज्ञानिक डॉ अजय देशपांडे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. डॉ देशपांडे यांनी इर्शाळवाडीच नाही.. तर तळीये आणि माळीण या गावांमध्येही तेव्हा घडलं होतं याचा खुलासा केला आहे.


इर्शाळवाडी समुद्रसपाटीपासून 400 मीटर उंचीवर आहे तर वाडीपासून आणखी 200 मीटर उंचीवर इर्शाळगडाचा डोंगर आहे. इर्शाळवाडीच्या दोनशे मीटर उंचीवर असलेल्या इर्शाळगडावर खडकाचा तीव्र सुळका (कडा ) आहे आणि त्यावर कुठलेही झाडे नाहीत.. तज्ञांच्या मते असे कळे भूस्खलनासाठी जास्त धोकादायक असतात.


इर्शाळवाडी परिसरात दोन दिवसात सहाशे मिलिमीटर पाऊस पडला आणि डोंगराच्या भुसभुशीत मातीने तेवढा प्रचंड जलसाठा धरून ठेवला.. नंतर पाण्याच्या वजनाने डोंगराचा तो भाग खाली खचला असावा असा तज्ञांचा अंदाज आहे. माळीणमध्ये जवळच्या डोंगरावर मानवी हस्तक्षेपामुळे आणि जमीन सपाटीकरणामुळे घटना घडली होती. तळीये दोन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं होतं. त्या ठिकाणी घडलेली घटना इर्शाळवाडी सारखीच सॉलिफ्लुक्षण मुळे घडली असावी असे तज्ञांना वाटते आहे...


इर्शाळवाडी मुख्य गावापासून जास्त उंचीवर आहे. मुख्य गाव सुरक्षित ठिकाणी आहे.. मात्र इर्शाळवाडी भूस्खलनाच्या अनुषंगाने धोक्याच्या ठिकाणीच वसलेली होती. जर रिमोट सेन्सिंग तंत्राद्वारे मिळणाऱ्या सॅटॅलाइट इमेज, थ्रीडी इमेज यांचा योग्य वापर केला.. तर महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या वाड्या वस्त्या सुरक्षित ठिकाणी आहे, की धोक्याच्या ठिकाणी आहेत, याचं वर्गीकरण नक्कीच करता येऊ शकते असेही तज्ञांना वाटते आहे...