CM Eknath Shinde Delhi Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे काल (21 जुलै) दहाच्या सुमारास अचानक मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही. मुख्यमंत्री शिंदे वैयक्तिक कामासाठी दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी तिथे जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची (BJP Leaders) भेट घेणार आहेत. परंतु त्यांच्या या दौऱ्यामागचं मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाही.


याआधी एनडीए बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत


याआधी मंगळवारी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. त्यावेळी भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी ते दिल्लीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. आज ते भाजपश्रेष्ठींची भेटी घेतील असं म्हटलं जात आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या भेटीत एखादा मोठा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा आधीपासूनच रंगली आहे.


मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर अंतिम निर्णय होणार?


महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनपेक्षितपणे सामील झालेल्या अजित पवार गटामुळे आधीच शिंदे गटाचे आमदारांमध्ये चलबिचलता सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देखील मिळालं. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं म्हटलं जात आहे. हा विस्तार कधी होणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर अंतिम निर्णय होतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


अमोल मिटकरी यांचं ट्वीटने चर्चांना उधाण


दरम्यान एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओला 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने खास अंदाजात अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.


हेही वाचा


NDA च्या बैठकीनंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा; तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे शाहांचे आदेश