मुंबई : बुधवारी रात्री इर्शाळवाडीमध्ये (Irshalwadi Landslide) दरड कोसळल्याची घटना घडली. आतापर्यंत 119 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र आतापर्यंत दुर्दैवाने 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं.


एकनाथ शिंदे म्हणाले की, सतत पडणारा पाऊस आणि चिखल, धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. त्या ठिकाणी अजून काही लोक अडकल्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेसोबत स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बचत कार्यात मदत केली. गुरूवारी दिवसभरात एकूण 119 लोकांना वाचवण्यात यश आलं. नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहे. आतापर्यंत या घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झालेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येत आहे.


आजही या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. घटना घडल्यापासून दोन तासांच्या आत आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली, गिरीश महाजनांचे विशेष काम आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी या ठिकाणी राहून विशेष लक्ष देत आढावा घेतला. या सर्वांमुळे बचाव कार्यामध्ये गती आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इर्शाळवाडीमध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी काम करत असलेली यंत्रणा जीव ओतून काम करत आहे. त्या ठिकाणी अडकलेल्या, वाचलेल्या सर्व लोकांची सोय आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. त्यासाठी कंटेनर मागवण्यात आलेले आहेत. जो पर्यंत त्यांची कायमस्वरूपी सोय होत नाही तोपर्यंत त्यांना मदत केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. सीडकोला त्या ठिकाणी लोकांना कायमस्वरूपी घरं बांधण्याचा आदेश दिला आहे. या लोकांना सर्व त्या सोई उपलब्ध करून देण्यात येतील. 


रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी (Raigad Irsalwadi Landslide) हे गाव. डोंगराच्या पायथ्याशी, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावावर काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. एरव्ही या वाडीपर्यंत पोहोचणं हे अत्यंत कसरतीचं काम, मग पावसाळ्यात तर त्याचा विषयच नाही. पण घटना घडल्याची माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत थेट या वाडीवर पोहोचले.  


हे ही वाचा :


Eknath Shinde: कोणतीही आपत्ती असो, एकनाथ शिंदे यांच्यातील 'शिवसैनिक' पोहोचतो थेट स्पॉटवर; 'या' घटना आहेत साक्षीदार