Tree Planting  : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या (Public Works Department) वतीनं 20 हजार वृक्षांची लागवड (Tree Planting) केली जाणार आहे. याचा शुभारंभ मोरगाव इथं आज (22 जुलै) केला जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता मोरगाव इथं मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते हा वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 'पर्यावरणाप्रती कृतज्ञता-वृक्षारोपण व संवर्धन’ या अभियानाअंतर्गत ही लागवड केली जाणार आहे. 


 स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड हा मुख्य उद्देश


सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यामध्ये त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि शासकीय इमारत परिसरात किमान 10 फूट उंचीचे 20 हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे. स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करणे या वृक्षारोपणाचा मुख्य हेतू आहे. 


आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील नर्सरीमधून वैशिष्टपूर्ण झाडांची निवड


वृक्षारोपणासाठी 10 ते 12 फूट उंचीच्या वैशिष्टपूर्ण झाडांची निवड आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील नर्सरीमधून करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, सोनचाफा, कदंब, बहावा, आंबा, मोहोगणी, कैलासपती आदी वृक्षांची लागवड करुन शाश्वत आणि हरित पर्यावरण करण्याचा संकल्प केला आहे. यामुळं परिसर सुशोभीकरण, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदलाचे परिणामावर उपाययोजना यासारखे पर्यावरणीय फायदे होण्यास मदत होणार आहे. प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्याअंतर्गत असलेल्या 17 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्त असलेली पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे तसेच नागरिकांच्यी गर्दी असलेल्या ठिकाणी किमान पाच कि.मी. लांबीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता चव्हाण यांनी दिली.


निसर्गास काही तरी दिले पाहिजे या उदात्त हेतूने वृक्षांची लागवड


दरम्यान, वृक्ष लागवडीच्या या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवत स्वतः एक हजार झाडे देण्याचा आणि त्यांचे वृक्षारोपण करुन 13 वर्ष जगवण्याचा संकल्प केला असल्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण म्हणाले. सर्व अभियंत्यांनी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त करुन पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. निसर्गाचे आपण देणे लागतो. त्यादृष्टीनं आपण निसर्गास काही तरी दिले पाहिजे या उदात्त हेतूने रस्त्याच्या कडेला आणि शासकीय इमारती परिसरात झाडे लावून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी व्यक्त केले. आज या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम (वैद्यकीय) उपविभाग बारामतीच्यावतीने करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Tree Plantation : नांदी फाउंडेशनचा चार कोटी वृक्षलागवडीचा अभिनव संकल्प, तब्बल 53 लाख वृक्षांची नव्याने करणार लागवड