शिवसेनेने पाठिंबा मागायला हवा, आमच्या अटी-शर्थी असतील : नवाब मलिक
भाजपच्या भूमिकेनंतर राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला निमंत्रण देणार याकडे आमचं लक्ष आहे. राज्यात एक आणि केंद्रात एक अशा दोन भूमिका शिवसेना घेऊ शकत नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
मुंबई : भाजपने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राष्ट्रवादीने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. शिवसेनेला आमचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी तसा आधी प्रस्ताव दिला पाहिजे. त्यानंतर चर्चा करून सत्तास्थापनेबद्दल निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेकडून अद्याप पाठिंब्याबाबत प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास आमच्या काही अटी-शर्थी असतील. सत्ता स्थापन करायची असेल तर आधी सरकार कसं चालेल यावर बैठकीमध्ये चर्चा होईल. या चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल. राष्ट्रपती राजवट टाळायची असेल, तर शिवसेनेनं आधी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, तोपर्यंत राष्ट्रपती राजवट टाळता येणार नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
भाजपच्या भूमिकेनंतर राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला निमंत्रण देणार याकडे आमचं लक्ष आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असं संजय राऊत सांगत आहेत. मात्र शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आधी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. शिवसेनेनं केंद्र सरकारमधील भाजपसोबत असलेली युती तोडली पाहिजे. राज्यात एक आणि केंद्रात एक अशा दोन भूमिका शिवसेना घेऊ शकत नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
शिवसेनेसोबत जायचं की नाही याबाबत आमचा अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे बहुमताचा आकडा नाही. येत्या 12 नोव्हेंबरला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत आमदारांसोबत खुली चर्चा होईल, त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेबाबत निर्णय घेण्यात येईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.