पंतप्रधानांकडून 'बिहार रेजिमेंट'चेच कौतुक, सामनातून मोदींवर टीकास्त्र
गलवान खोऱ्यात 'बिहार रेजिमेंट'ने शौर्य गाजवलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. चीनबरोबरच्या हिंसक झटापटीत बिहार रेजिमेंटचे सैनिक होते, देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?; असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यावरूनही सामनातून टिका करण्यात आली आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात 'बिहार रेजिमेंट'ने शौर्य गाजवलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. चीनबरोबरच्या हिंसक झटापटीत बिहार रेजिमेंटचे सैनिक होते, देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?; असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसेच गोपीचंद पडळकर यांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपाची 'मन की बात' तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
'मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना भाजपवाले देशद्रोही ठरवतात. मात्र, शरद पवार यांच्यावर तशीच टीका झाली तर भाजपवाले हात झटकून मोकळे होतात. मध्यंतरी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनीही सीमेवरील सैनिकांच्या पत्नीबाबत खालच्या पातळीवरील विधान केले होते. एकप्रकारे ती सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची मानखंडनाच होती. त्या आमदाराला भाजपने आधी झटकले आणि नंतर पुन्हा जवळ केले. गोपीचंद पडळकर यांच्याबाबतीतही भाजप हेच करेल', असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.
सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टिका करण्यात आली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याच्या गुळण्या पडळकर यांनी टाकल्या. 'पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहांना भडकवायचे आणि लढवायचे हे धोरण राबविले', असे ते म्हणतात. 'पवारांकडे विचारधारा नाही, व्हिजनही नाही आणि अजेंडा नाही', असे मनाचे श्लोकही गोपीचंद यांनी म्हटले आहेत. गोपीचंद यांनी ही जी विधाने पवारांबाबत केली ती भाजपाच्या काही नेत्यांनी अधूनमधून केलीच आहेत, असं म्हणत सामनातून भाजपावर तोफ डागण्यात आली आहे.
काय आहे सामनाच्या अग्रलेखात?
गोपीचंद हे राजकारणामधील कच्चे मडके आहे हे माहीत होते, पण कच्चे मडके फुटकेदेखील आहे हे आता सिद्ध झाले. पडळकर यांनी पवारांबाबत केलेली विधाने वादग्रस्त आहेत. पवारांची ज्येष्ठता, अनुभव, व्यासंग, समाजकारण याचा गौरव पंतप्रधान मोदी यांनीही अनेकदा केला आहे. पवार यांना महाराष्ट्रात आणि देशात मोठा मान आहे. पवार हे आपले गुरू असल्याचे मोदी यांनी न डगमगता सांगितले आहे. गोपीचंद हे आज भाजपाच्या बिळात शिरले आहेत. बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले.
पडळकरांनी सांगलीमध्ये भाजपाविरोधात निवडणूक लढवली. 'भाजपाला मत देऊ नका. मी भाजपासाठी कधी मत मागायला आलो तर जोड्याने मारा मला,' असे हेच पडळकर तेव्हा सांगत. पुढे हेच पडळकर भाजपामध्ये आले व बारामतीत अजित पवारांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार झाले. पण बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही पडळकरांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे या महाशयांचा अजेंडा, व्हिजन वगैरेबाबत गोंधळ आहे. पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत हा गोपीचंद यांचा आक्षेप आहे. यात पवारांचा संबंध येतोच कुठे? हा फैसला फडणवीस सरकारने करायचा होता.
कोणताही अभ्यास, संदर्भ, जनमत पाठीशी नसलेले लोक भाजपाने भरती करून स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली आहे ती अशी! शरद पवार यांच्याबाबत राजकीय मतभेद असू शकतात. त्यांच्यावर टीकाटिप्पणी होऊ शकते. लोकशाहीत हे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, पण पवारांसारख्या ज्येष्ठांवर अशा घाणेरड्या शब्दांत टीका करणार्यांनी स्वतःचे पाय कोठे आहेत, आपली लायकी काय याचे आत्मपरीक्षण आधी करावे.
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी तळागाळातील बहुजन समाजाला राजकारणात मानाचे पान दिले. त्यामुळे 60 ते 70 वर्षांत पवारांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवले अशी वाचाळकी करणे हे मूर्खाचे लक्षण तर आहेच, पण मनाला कोरोना झाल्याचीही लक्षणे आहेत. त्यामुळे गोपीचंद यांची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे. गोपीचंद पडळकर यांच्या विधानाशी भाजपाचा संबंध नाही असा साळसूदपणाचा आव आता भाजपाने आणला. हे सगळ्यात मोठे ढोंग आहे. मोदी यांच्यावर टीका करणार्यांना हे लोक देशद्रोही ठरवतात आणि पवारांवर तशीच टीका करणार्यांपासून मात्र स्वतःला झटकतात.
महत्त्वाच्या बातम्या :
कोरोनावरील फॅबीफ्लू औषधावर खासदार अमोल कोल्हेंचा आक्षेप, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे त्यांना मस्ती; निलेश राणेंची टीका