Sanjay Raut : ...तरीपण ते कोणत्या नशेत बोलले माहीत नाही; राऊतांचा दानवेंना खोचक टोला
Sanjay Raut on Raosaheb Danve Statement : माझ्याकडे अशी माहिती नाही की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे.
Sanjay Raut on Raosaheb Danve Statement : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 25 आमदार संपर्कात असून निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येतील, असं म्हणणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. माझ्याकडे अशी माहिती नाही की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे. तसेच, भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच, असंही संजय राऊतांनी सांगतिलं आहे.
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बोलताना म्हणाले की, "काल धुळवड होती. लोक धुळवडीला नशा करतात, अशी परंपरा आहे. पण माझ्याकडे अशी माहिती नाही की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत. माझे चांगले मित्र आहेत ते. मी त्यांना अनेक वर्ष पाहतोय. दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. त्यांना भांगेची किंवा इतर कोणतीही नशा करण्याची आवश्यकता पडली नाही. तरीपण ते कोणत्या नशेत बोलले काल धुळवडीला ते मला माहीत नाही. ते 25 बोललेत कदाचित त्यांना 175 बोलायचं असेल. की, 175 आमदार महाविकास आघाडीचे आमच्या संपर्कात आहेत. स्लिप ऑफ टंग झाली असेल. घ्या ना, मग थांबलात कशासाठी? या फुसकुल्या कोणासाठी सोडताय?"
"जर मी म्हटलं की, भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच. तर तुम्ही काय म्हणाल? पण आता होळी संपलेली आहे. रात्री नशा उतरलेली असेल. त्यामुळे काल काय बोललो ते त्यांना आता आठवणार नाही.", असं संजय राऊत म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ : रावसाहेब दानवे भांग घेत नाहीत पण काल कोणत्या नशेत बोलले माहित नाही : संजय राऊत
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले. निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील, असं सांगत महाविकास आघाडीचे आमदार आपल्या संपर्कात आहेत, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते. ज्यांची मौत आलीय, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, खोदता खोदता त्यांच्याच अंगावर न पडो अशीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली होती. मविआचे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही असंही ते म्हणाले होते.
रावसाहेब दानवे म्हणाले होते की, "ज्या दिवशी त्यांनी आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेंव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. त्यांनी आता हिरवं पांघरून घेतलंय ,आता हिरव्याचं समर्थन करतात. आज राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा-भगवा करतात. भेसळ आमच्यात आहे का त्यांच्यात त्यांनी पाहावं. भेसळ दोन-तीन एकत्र आले की भेसळ होत असते."