राऊत म्हणतात, भाजपनं आमच्या आमदारांचं अपहरण केलं; शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय-काय घडलं?
Sanjay Raut on Shivsena Leader Eknath Shinde : हे सर्व भाजपचं षडयंत्र असल्याचं राऊतांनी म्हटलं. तसेच, शिवसेना संघटनेला तडा गेलेला नाही, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
Sanjay Raut on Shivsena Leader Eknath Shinde : सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या आमदारांच्या गटासह नॉटरिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. सूरतमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वर्षावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना हे सर्व भाजपचं षडयंत्र असल्याचं राऊतांनी म्हटलं. तसेच, शिवसेना संघटनेला तडा गेलेला नाही, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख, आमदार, खासदार मोठ्या प्रमाणात होते. हा प्रसंग निर्माण झालाय किंवा निर्णाम करण्यात आला आहे. यामागे भाजपचं षडयंत्र आहे. बरेच दिवस जे ऑपरेशन लोटस सुरु होतं. तर तो प्रकार या लोकांनी सुरु केला आहे. आमच्या आमदारांना अपहरण करुन गुजरातला नेलं नसतं. गुजरात पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या गराड्यात त्यांना ठेवलं नसतं. अनेक आमदारांनी तिथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत आणि खूनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे."
"काही आमदारांनी कळवलं आहे की, आमच्या जीवाला धोका आहे. इथे आमचा खूनही होऊ शकतो. असं वातावरण का निर्माण केलं जातंय, मला कळत नाही. पण या सगळ्यातून शिवसेना बाहेर पडेल. शिवसेनेचं संघटन पुन्हा एकदा यातून उभं राहिलं. कोणी कितीही म्हणत असलं तरी संघटनेला तडा गेलेला नाही. संध्याकाळी पुन्हा बैठक होणार आहे. अनेक आमदारांनी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधला.", असं राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा कोणताही प्रस्ताव स्विकारणार नाही, शिवसेनेची भूमिका
एकनाथ शिंदेंची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंनी दिलेला कोणताही प्रस्ताव शिवसेना स्विकारणार नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह झालेल्या शिवसेना नेते आणि आमदार, खासदारांच्या बैठकीत एकमतानं ठरवण्यात आलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा बंड मोडून काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करणार आहेत. तसे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना देण्यात आले आहेत.