Kirit Somaiya : संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला, निवडणूक आयोगानं चौकशी करावी, भाजपची मागणी
शिवसेना नेते संजय राऊत यांनीआचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
Kirit Somaiya on Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. संजय राऊतांनी सहा आमदारांची नावं घेतली. त्यांना आमदारांच्या मतदानाबाबत कळलं कसं? असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. राऊतांनी गुप्त मतदानाचा भंग केला आहे. त्यांनी कोणत्या आधारावर या सहा आमदारांची नावं घेतली असेही सोमय्या म्हणाले. निवडणूक आयोगानं याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं भाजपनं सांगितलंय.
अपक्षानं कोणाला मतदान केलं हे फक्त निवडणूक आयोगाला कळतं
एवढ्यातच संजय राऊत घाबरले आहेत. त्यांनी काही आमदारांची नावे घोषीत केली आहेत. असे करुन त्यांनी निवडणूक आयोगाचा भंग केला आहे. थेट माफियागिरी त्यांनी सुरु केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तुम्ही सहा लोकांचीच नावं कशी घेतली? त्याला आधार काय? असे सवालही सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत. याची निवडणूक आयोगानं चौकशी करावी असे सोमय्या म्हणाले. संजय राऊत यांना याचं उत्तर द्याव लागेल असे सोमय्या म्हणाले. कोणत्या अपक्षानं कोणाला मतदान केलं हे फक्त निवडणूक आयोगाला कळतं असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गोपनियतेचा भंग केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्या आमदारांनी जर याबाबत काही आक्षेप घेतले आहेत. उद्धव ठाकरेंना या आमदारांना धमकी द्यायची आहे. विधानपरिषदेसाठी धमकी देण्याच काम सुरु असल्याचे ते म्हणाले.
आत्मपरीक्षण करा, अहंकारातून बाहेर या : दरेकर
संजय राऊत हे आमदारांची नावे घेऊन त्यांच्या विश्वासहरतेवर प्रश्न निर्माण करीत आहेत. हा लोकशाहीचा छेद असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर काही आमदारांना 10 ते 35 कोटींचा निधी देण्याची प्रलोभने दाखवली गेली, त्याची चौकशी करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे दरेकर म्हणाले. शिवसेनेनं आत्मपरीक्षण कराव, अहंकारातून बाहेर या, विकास निधी देऊनही आमदारांनी मतदान केले नाही असे दरेकर म्हणाले. येणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतसुद्धा भाजप विजय होईल. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येऊ दे , विजयी घोडदौड अशीच राहू दे असे साकडे दरेकर यांनी तुळजाभवानी मातेला घातले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
हायव्होल्टेज ड्राम्यानंतर राज्यसभेच्या 6 जागांचा निकाल हाती आला. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या: