Sanjay Raut : राज्यपालांकडून मराठी कष्टकरी जनतेचा अवमान, मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेणार? संजय राऊतांचा निशाणा
Sanjay Raut : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचं वक्तव्य महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अवमान करणारं असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
Sanjay Raut : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचं वक्तव्य हे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अवमान करणारे असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. सर्वचं राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा धिक्कार केला आहे. अपवाद फक्त भाजप आणि भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत अद्यापही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला नसल्याचे राऊत म्हणाले. तसेच मराठी माणसाला रसातळाला नेण्याचं काम दिल्लीची यंत्रणा करत असल्याचा निशाणा देखील राऊतांनी लगावला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. सजंय राऊत यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे 40 आमदार कोणती भूमिका घेणार? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
भाजपची विचारसरणी ही फक्त पैशांच्या मागे
मुंबई ही महाराष्ट्राला मराठी माणसांच्या रक्तातून मिळाली आहे. भाजपची विचारसरणी ही फक्त पैशांच्या मागे धावत असल्याचे संजय राऊत म्हणाले. पैसेवाले म्हणजे राज्य, पैसा म्हणजे राजकारण, पैसेवाले म्हणजे देश भाजपची विचासरणी हे. महाराष्ट्र मुंबई हा कष्टकऱ्यांचा देश आहे. दिवंगत नाना शंकरशेठ यांनी या मुंबईचे वैभव वाढवलं. आमचे पारशी बांधव, पिढ्यान पिढ्या मुंबईत राहणारे गुजराती बांधव यांचेही योगदान आहे. पण आम्ही आज नाना शंकरशेठ यांचे चरित्र राज्यपालांना पाठवणार असल्याचे राऊत म्हणाले. आजची मुंबई ही आर्थिक राजधानी कशी झाली हे त्यांनी नाना शंकरशेठ यांच्या चरित्रातून वाचायला पाहिजे असे राऊत म्हणाले. मुंबईला आर्थिक वैभव प्राप्त व्हावं म्हणून असंख्य लोकांनी आपली संपत्ती, वैभव मुंबईसाठी दिलं. नाना शंकरशेट हे व्यापारी नव्हते तर ते सच्चे मराठी गृहस्थ होते असेही राऊत म्हणाले.
मराठी माणसांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचं काम दिल्लीची सत्ता करतेय
राज्यपालांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं आहे. सारखे ते अशी विधाने करत असतात. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपने काही प्रतिक्रिया दिली नसल्याचे राऊत म्हणाले. गुजराती, राजस्थानी बांधव इथे नसतील तर मराठी माणूस भिकारी आहे का? मुंबई आणि ठाण्याच्या जडण घडणीत मराठी माणसाचं काहीच योगदान नाही का? श्रम करणाऱ्या मराठी माणसांविषयी तुम्हा एवढा द्वेष का? असे सवालही राऊतांनी केले आहेत. मराठी माणसाला तुम्ही पैसे कमवून देत नाही. पैसे कमावायला लागला की केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचं काम दिल्लीची सत्ता करत असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: