सेनापती फिरला मात्र फौजेने काम केलं नाही, विधानसभेसाठी भाजप कार्यकर्त्यांची काँग्रेसला मदत - अर्जुन खोतकर
लोकसभेत मी आणि माझ्या परिवाराने दानवेंना मदत केली मात्र विधानसभेतलं चित्र वेगळं दिसलं, भाजप कार्यकर्त्यांनी सरळ सरळ काँग्रेसला मदत केली असा आरोप शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला आहे.
जालना : विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला मदत केल्याचं वक्तव्य शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. अर्जुन खोतकर यांनी विधानसभेतील पराभवासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बोट दाखवलं आहे. रावसाहेब दानवे यांच्यासाठी मी आणि माझ्या परिवाराने इमान-ए-इतबार काम केलं आहे, मात्र लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्या तुलनेने ज्या गोष्टी कानावर आल्या त्या चांगल्या नव्हत्या असं खोतकरांनी म्हटलं आहे.
Arjun Khotkar | विधानसभा निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांची काँग्रेसला मदत, शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचा आरोप | जालना | ABP Majha
विधानसभेसाठी गावातल्या भाजप कार्यकर्त्यांनी कामंच केलं नाही, त्यांनी सरळ सरळ काँग्रेसला मदत केलं असल्याचं समजलं आहे, आता हे गावपातळीवर झालं की वरिष्ठ पातळीवरसुद्धा झालं या गोष्टीची सध्या मी माहिती घेत आहे, असं अर्जुत खोतकर यांनी म्हटलं. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसला मदत केल्याचा आरोप खोतकरांनी केला आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळला नाही असंही ते म्हणाले. मी घाई करत निर्णयावर पोहोचणार नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, आणि याचे आदेश नक्की कुठून आले, या गोष्टीची पडताळणी करतोय असं खोतकर म्हणाले. खोतकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत दानवेंवरही नाव न घेता आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात गाजलेला वाद म्हणजेच अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे हा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेत माघार घेतल्याबाबत खंत व्यक्त केली. जालना मतदारसंघातील जनतेची माफीही त्यांनी मागितली. मी लढणारच असं ठरवलं होतं, लोकसभेच्या राजकारणात उतरायचं ठरवलंच होतं मात्र मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी समजवल्यानंतर माघार घेतली. माझ्या बाजूने जनता उभी राहिली मात्र माघार घेतली आणि त्यांच्या भावना पूर्ण करु शकलो नाही" त्यामुळे माफी मागितल्याचं खोतकरांनी म्हटलं. याप्रकरणावर रावसाहेब दानवेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन खोतकरांनी माझ्यावर आरोप केले नाहीत असं दानवे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांना सांगितलं.