(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी शिव शाहू आघाडी रिंगणात
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आली आहे.
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातील 10 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी शिव शाहू आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना, ऑल इंडिया युथ स्टुडंट फेडरेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ़ इंडिया या संघटनांचा समावेश आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माहिती दिली.
शिवाजी विद्यापीठाचा सर्व कारभार हा विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या हितासाठी पारदर्शी व स्वच्छ व्हावा, हा शिव-शाहू आघाडीचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा त्यांचे वेळेवर निकाल लावणे, विद्यापीठाचा कारभार भ्रष्टाचार विरहित असणे, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधांचा विस्तार, विद्यापीठाच्या सर्व संसाधनांचा पर्याप्त वापर करणे, विद्यापीठाची स्वाययत्ता अबाधित राहणे, नविन शैक्षणिक धोरणातील सर्व सामान्य विद्यार्थी विरोधी तरतुदींना विरोध, शिक्षणाचे खासगीकरण व नफेखोरीत विरोध, विद्यार्थ्यांवरील भरमसाठ फीवाढ धोरणाला विरोध, विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा कायमस्वरूपी भरणे, महाविद्यालयांच्या एकत्रीकरणास विरोध तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेची व संविधानातील मूल्यांची जपणूक शिवाजी विद्यापीठात व्हावी या सर्व मुद्द्यावर शिव-शाहू आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अधिसभा निवडणुकीसाठी आज आरक्षण जाहीर
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. चार विद्याशाखांमधील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेमध्ये 1 जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, एक जागा अनुसूचित जाती, जमातीसाठी आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेला 1 जागा खुल्या प्रवर्गातील महिला तर दुसरी जागा भटके विमुक्त यांच्यासाठी आहे. मानव्य विद्याशाखेतील एक जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेमधील 1 जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, ओबीसी साठी 1 जागा राखीव आहे.
दुसरीकडे 28 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या