गडचिरोलीतील दोन नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय
Gadchiroli Nagar Panchayat : गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. आज झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला आहे.

Gadchiroli Nagar Panchayat : गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा आणि कुरखेडा या दोन नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मूलचेरा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे विकास नेताम हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर कुरखेडा नगर पंचायतीमध्ये शिवसेनच्या अनिता बोरकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत.
"गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकामांना जनतेने दिलेला हा कौल आहे. शेती, आरोग्य, दळणवळण, वीज पुरवठा, रोजगार या क्षेत्रात जिल्हापातळीवर केलेल्या विकासकामांमुळेच शिवसेनेला हे मोठं यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्हा समन्वयक किरण पांडव आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या मेहनतीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मानून केलेल्या कामाला जनतेने दिलेली ही पोचपावती असून गडचिरोली जिल्ह्याची मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून काढण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याच्या' भावना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेनेने गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मिळवलेले हे यश मोठे आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वप्न साकार होत असल्याचं समाधान आहे."
दरम्यान, आज गडचिरोलीमधील काही नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उर्वरित ठिकाणी उद्या प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- नांदेडमध्ये दोन नगरपंचायतीत काँग्रेसचे नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादीला एका ठिकाणी संधी
- Kirit Somaiya on Sanjay Raut : विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट; किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
- सगळ्यांना उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे? भाजपने पत्रकार परिषद जरुर पाहावीच - संजय राऊतांनी दंड थोपटले
- Shivjayanti 2022 : शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर, गृहविभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
