(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानपरिषदेच्या उपसभापती निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप आमने सामने
विधानपरिषदेत सध्या 78 पैकी 18 जागा रिक्त आहेत. सध्या विधानपरिषदेमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून भाजपचे 22 आमदार आहेत.
मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी उद्या भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार आहे. शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी अर्ज भरला असून भाजपतर्फे भाई गिरकर यांनी अर्ज भरला आहे. उद्या सकाळी सभागृहात अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मात्र भाजपने उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे उपसभापती पदाची निवडणूक घेऊ नये अशी विनंती भाजपने याआधीच विधानपरिषदेच्या सभापतींकडे केली होती. कोरोनाचा पार्श्वभूमीवर आमदारांना उपस्थित राहण्यास अडचणी येत असल्याने त्यांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेऊन लोकशाहीची गळचेपी केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र आज सोमवारी विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच सभापती यांनी मंगळवारी म्हणजे उद्या निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले.
विधानपरिषदेत सध्या 78 पैकी 18 जागा रिक्त आहेत. सध्या विधानपरिषदेमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून भाजपचे 22 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 14, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, काँग्रेसचे 8 आहेत. मित्रपक्ष आणि शिक्षक आमदारांसह भाजपचे संख्याबळ 25 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीचे संख्याबळ हे मित्रपक्ष, अपक्षांसह संख्याबळ 35 असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मात्र उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीला खास करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोरोनामुळे अनुपस्थितीत असलेल्या सर्व आमदारांना भाजपने उद्या बोलवून घेतले आहे. तसेच कोरोनाची लग्न झालेल्या आमदारांना ऑनलाईन पद्धतीने मतदानाचा अधिकार देण्याची मागणी सभापतींकडे करण्यात आली आहे. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात फोडाफोडीच्या राजकारणाला उत येतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
विधानपरिषद पक्षीय बलाबल
एनसीपी - 9 काँग्रेस - 8 शिवसेना - 14 भाजपा - 22 लोकभारती - 1 शेकाप - 1 राष्ट्रीय समाज पक्ष - 1 अपक्ष - 4 रिक्त - 18 जागा