(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ACB कडून बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची किंमत फक्त 10 हजार, राजन साळवींची संतप्त प्रतिक्रिया!
Shiv Sena UBT MLA Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीच्या फेऱ्यात आहे.
Shiv Sena UBT MLA Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीच्या फेऱ्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी केली जातेय. जानेवारी 2024 मध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापा मारला होता. या छापेमारीमध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या घरात झाडाझडती घेतली. यावेळी घरातील संपत्तीची मोजदाद केली. यावरुन राजन साळवी यांनी भावनिक पोस्ट केली. अँटी करप्शन (ACB) कडून माझा निष्ठतेचे मोल दुर्दैवी असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलेय. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून खुर्ची माझ्याकडे होती. त्यावर त्यांचा फोटोही होता. एसीबीने त्या खुर्चीची किंमत ठरवली, हे दुर्वैवी असल्याचं राजन साळवी यांनी पोस्टमध्ये म्हटलेय.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी तीन फोटो पोस्ट केले आहेत. अँटी करप्शनने केलेल्या वस्तूंची यादी व त्याच्या किमतीची यादीच साळवी यांनी सोशल मीडियावर जाहीर केली आहे. राजन साळवी यांनी अँटी करप्शनने वस्तूंच्या यादीमध्ये आपल्याला वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आसनाचीही दुर्दैवीरित्या किंमत केली आहे, असं सांगत अँटी करप्शनच्या कारवाई वरुन सरकारवर निशाणा साधला. एसीबीने बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची आणि फोटो फ्रेमची किंमत 10000 ठरवल्याचं कागदपत्रामध्ये दिसत आहे.
राजन साळवी यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेय ?
अँटी करप्शन (ACB) कडून माझा निष्ठतेचे मोल दुर्दैवी. काही दिवसांपूर्वी माझ्या रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शन (ACB) ने धाड टाकली. त्यांना सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आसनावर बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना चालवली, वाढवून आज जे राज्यकर्ते झालेत, त्यांना नावारूपाला आणले त्यांच्या आदेशाने त्या माझा घरातील आसनांची किंमत ठरवावी दुर्दैवीच ना.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना महाराष्ट्र भर तळागाळापर्यंत रुजवली ते आसन मी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ह्यांच्या परवानगीने माझा निवासस्थानी नित्यपूजेसाठी आणले. त्यावेळी माझा चिरंजीव अथर्व ह्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या वरील निष्ठेने एक त्यांचे सुंदर चित्र रेखाटले. माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनांची नित्यनियमाने पूजा करतो, परंतु दुर्दैवाची बाब माझा रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शन (ACB) ने धाड टाकली व त्या आसनांची व फोटोची मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो त्याची किंमत ठरवली खुप दुर्दैवी.
ज्यांना बाळासाहेबांनी घडवले नावारूपाला आणले त्या राज्यकर्त्यांच्या आदेशाने माझा निवासस्थान येथील बाळासाहेबांच्या आसनाचे व माझा निष्ठेचे मोल करावे दुर्दैवी.....https://t.co/KlwXGTXTbn pic.twitter.com/FDRLXcduYV
— M L A Rajan Salvi (@MLARajanSalvi) February 2, 2024
राजन साळवी यांच्यावर काय आहेत आरोप?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून आतापर्यंत सात ते आठ वेळा चौकशी झाली आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2009 ते २ डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे.