(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की वेगळा निर्णय घेणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने (Mahayuti) ऐतिहासिक विजय मिळवला तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. महायुतीच्या विजयानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले असून सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की वेगळा निर्णय घेणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत जाहीर वक्तव्य केले आहे.
गुलाबराव पाटील यांनी जळगावात माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि ते नाराज राहू देखील शकत नाही. मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे ठरवतील ते त्यांना मान्य असणार असल्याचं त्यांनी अगोदरच जाहीर केले आहे. येत्या पाच तारखेला शपथ विधी होईल, अशी अपेक्षा असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
ठाकरेंचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे यायला तयार : गुलाबराव पाटील
महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून आपल्या गावी शेतात राहण्यासाठी गेले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. जे शेतात राहतात ते शेतात जातील, जे महालात राहतात त्यांना काय कळणार? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तर आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत, त्यांना काय माहित शिवसेना ज्यांनी मोठी केली ते आज कुठे आहेत. आम्ही आंदोलने केले तेव्हा शिवसेना मोठी झाली. त्यांच्या महालात आमचीही विट आहे. हे त्या विटांना विसरले आणि संजय राऊत सारखा दगड त्यांनी आणला. या दगडाने सगळा सत्यानाश करून टाकला आहे. संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी ओळखावे. नाही तर संजय राऊत यांच्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या वीस पैकी दहा आमच्याकडे यायला तयार आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. तर गृहखाते आणि महसूल खात्याच्या संदर्भात तिन्ही पक्षात चढाओढ असल्याचं मानल जात आहे. कोणतेही खाते मागणे यात गैर काहीच नाही, यात नेत्यांमधे चर्चा होईल आणि निर्णय होईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे : गुलाबराव पाटील
भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार हे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला तर गुलाबराव पाटील आणि दीपक केसरकर यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, आमचा आग्रह हाच आहे की, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे. त्यांनी सत्तेत राहावे, उपमुख्यमंत्री व्हावे आणि पक्षाचे कामं असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा