(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'माणूस 'नॉर्मल' असो वा राणेंसारखा 'अॅबनॉर्मल', कायदा सगळ्यांसाठी सारखाच', शिवसेनेची टीका
आज सलग दुसऱ्या दिवशी सामनाच्या (Shiv Sena Saamana) अग्रलेखातून भाजप आणि नारायण राणेंवर (BJP Narayan Rane) टीका करण्यात आली आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. काल नारायण राणे यांना हायकोर्टानं दिलासा दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर आज सलग दुसऱ्या दिवशी सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि नारायण राणेंवर टीका करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे 'पर'आत्मा नारायण राणे यांच्यावर कायद्यानेच कारवाई झाली व माणूस 'नॉर्मल' असो वा राणेंसारखा 'अॅबनॉर्मल' कायदा सगळ्यांसाठी सारखाच हे राज्याच्या पोलिसांनी दाखवून दिले, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, राज्यात इकडे तिकडे थोडे काही झाले की, विरोधी पक्षाची कुंडलिनी जागी होते व राज्यात कायद्याचे राज्य आहे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. यापुढे महाराष्ट्रात विरोधकांकडून हे असले प्रश्न विचारले जाणार नाहीत. राणे यांची अटकही इतर सामान्य गुन्ह्याप्रमाणे आहे. असे गुन्हे इकडे तिकडे घडतच असतात. कोणीतरी कुणाला धमक्या देतो, जीवे मारू असे बोलतो. त्यावर समोरची फिर्यादी व्यक्ती इंडियन पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल करते. पुढे पोलीस आपले काम करतात. राणे यांच्याबाबतीत वेगळे असे काहीच घडल्याचे दिसत नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्रात तालिबानी पद्धतीचे राज्य सुरू आहे काय?’ वगैरे सवाल विरोधी पक्षाने उपस्थित करणे निरर्थक आहे. ‘‘राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील कारवाई योग्य नाही,’’ हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक द्या, अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली (फौजदारी) करणाऱ्या फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही, असंही लेखात म्हटलं आहे.
लेखात पुढं म्हटलं आहे की, राणे यांना पोलिसांनी पकडल्यावर राज्यात अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट असल्याचे म्हणणे हा राज्याचा अपमान आहे. फडणवीस व इतरांना राणे हे काय खान अब्दुल गफार खान वाटले काय? कायद्याने चाललेले राज्य मोडण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न आहेत, पण त्यांचे प्रयत्न चिरकूट पद्धतीचे आहेत. हे राज्य जितके आजच्या सत्ताधारी पक्षाचे आहे तेवढेच ते विरोधी पक्षांचेही आहे. तेव्हा राणे यांच्या अटकेनंतर भाजपावाल्यांना इतक्या मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते, असा टोलाही लगावला आहे.
आणखी काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात
भाजपामधील फौजदारी वकिलांनी राणे यांच्या धमकीवजा वक्तव्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. चंद्रकांत पाटलांकडून ती अपेक्षा नाही. मुल्ला ओमरसारखे लोक भाजपात आले तर त्यांच्याही समर्थनासाठी डोक्याला तेल फासून ते उभे राहतील. त्यामुळे ही जबाबदारी भाजपातील शहाण्यांवरच आहे. पुन्हा तेथे बाहेरून आलेल्या दीडशहाणे व अतिशहाण्यांची फौज निर्माण झाली आहे ती वेगळीच. त्यामुळे भाजपात अतिशहाणपणाचे जे अजीर्ण झाले ते राज्याच्या स्वच्छ वातावरणासाठी धोकादायक आहे. राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी हे आव्हान आहे. राणे यांनी स्वतःला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपाही वाचेल,” अशा शब्दांमध्ये राणेंवर निशाणा साधण्यात आलाय.
मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते (राणे) महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात व जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे ‘महान’ हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी. राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. त्यास सर्वस्वी राणे व त्यांची तळी उचलून धरणारे भाजपामधील नतद्रष्ट जबाबदार आहेत. शिवसेना-भाजपामध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते. राणे, प्रसाद लाड हे मूळ भाजपावाले नसलेले ‘बाटगे’ भाजपानिष्ठेची जोरात बांग देऊ लागल्यावर ते घडले हे समजून घेतले पाहिजे. राणे व लाड यांच्यासारखे फुटकळ लोक कधीपासून हिंदुत्ववादी झाले? भाडोत्री लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कोणी शिवसेनेवर हल्ले करू पाहत असतील तर त्यांनी आपल्या गोवऱ्या आताच सोनापुरात रचून याव्यात. शिवसेनेचे हृदय वाघाचे आहे. शिवसेना अशा लढाया स्वबळावरच लढत आली आहे. त्यांना राणे, लाडसारखे भाडोत्री लोक लागत नाहीत. राणे व त्यांची मुले मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व ज्येष्ठांचा उल्लेख एकेरीत व घाणेरड्या भाषेत करतात, हीच त्यांची संस्कृती. माणसाने आपली लायकी दाखवायची ठरवली की, हे असे व्हायचेच. घरात व दारात भरपूर गांजाची शेती पिकवायची व त्याच गांजाचे सेवन करून कुणावरही कसेही बकायचे हा सध्या अनेक राजकारण्यांचा धंदा झाला आहे. ही गांजाची शेती कायद्यानेच बंद केली पाहिजे व त्याची सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्राची जनता ठाकरे सरकारला धन्यवाद देत आहे. फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर त्यांची नशा लवकरात लवकर उतरो हीच ‘अटल’चरणी प्रार्थना, दुसरे काय बोलायचे! राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही ‘वर आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?’ अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात. महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनीही कधी केली नव्हती. राणे हे ‘नॉर्मल’ मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपाने आता तरी शहाणे व्हावे,” असा सल्ला लेखाच्या माध्यमातून भाजपाला दिला आहे.