(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MLA Disqualification Case : निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने, मंत्री तानाजी सावंत पात्र, नार्वेकरांचा मोठा निर्णय
MLA Disqualification Case : 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय जाहीर आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला आहे.
MLA Disqualification Case : दोन वर्षांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यातील पहिल्या अंकाचा शेवट आज झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरु शकत नाहीत, असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी आज दिला. राहुल नार्वेकरांच्या निर्णायामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदार पात्र ठरले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. यामध्ये मंत्री तानाजी सावंत यांचाही समावेश होता.
राहुल नार्वेकर काय म्हणाले ?
शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत. बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नाही. यासाठी फारफारतर पक्षांतर्गत कारवाईसाठी ते पात्र ठरू शकतात, असे निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने 21 जून 2022 च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
2022 मध्ये राज्यसभा आणि त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. याच निवडणुकांनंतरच शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस बंडाच्या स्वरुपात बाहेर पडली. एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह मुंबईहून सूरत आणि थेट गुवाहाटी गाठलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. शिवसेतेच उभी फूट अशी बातमी झळकली आणि शिवसेनेतीन वरिष्ठांसह अगदी सामान्य शिवसैनिकांपर्यंत सगळ्यांची धाकधूक वाढली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या नेत्यांमध्ये भूम-परांडाचे आमदार, मंत्री तानाजी सावंत यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्याविरोधातही पक्षविरोधी कारवाई केली. त्याचाच निकाल आज लागला आहे. राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर तानाजी सावंत यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. एका शेतकरी कुटुंबातून सुरु झालेला तानाजी सावंत यांचा प्रवास आता मंत्रिपदापर्यंत पोहचलाय. तानाजी सावंत यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात..
2019 च्या निवडणुकीत काय झालं ?
तानाजी सावंत हे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांचा पराभव केला होता. तानाजी सावंत यांना 106674 इतकी मतं पडली होती. तर राहुल मोटे यांना 73772 मते मिळाली होती.
दुसऱ्यांदाही आमदार अन् मंत्री -
तानाजी सावंत हे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदे सरकारमध्ये त्यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कारभार आहे . देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही त्यांनी मंत्रीपदाचं काम पाहिलेय. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली कारकीर्द सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र म्हणून पुण्याची निवड करत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत.
तानाजी सावंत यांचा परिचय -
तानाजी सावंत हे सध्या भूम परांडा वाशी या विधासभा मतदार संघाचे आमदार आहेत. दुसऱ्यांदा ते आमदार झाले. पहिल्या टर्मला म्हणजे फडणवीस सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली होती.मात्र, 2019 महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली नव्हती. 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2016 साली शिवसेना उपनेते म्हणून नियुक्त करण्यात आले. 2016 साली सावंत विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. 2017 साली उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख नियुक्त झाले. तानाजी सावंत हे 2014 सालच्या शिवसेना भाजप सरकारमध्ये जलसंधारण मंत्री झाले होते. 2019 च्या निवडणुकीत उस्मानाबाद येथील भूम परांडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज होते. पुणे आणि सोलापुरातल्या बार्शीत तानाजी सावंत यांच्या शिक्षणसंस्था आहेत. तानाजी सावंत यांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव हे गाव आहे.साखर कारखानदारी क्षेत्रातील मोठं नाव म्हणून तानाजी सावंत यांच्याकडे बघितलं जातं. शिक्षण क्षेत्रातही तानाजी सावंत यांचे नाव घेतलं जातं. पुणे जिल्ह्यात त्यांच्या जेएसपीए नावानं शिक्षणसंस्था आहे.