आधी पुतण्या, मग भाऊ अन् आता वहिनींचाही 'दादां'ना विरोध; अजित पवारांना दिवसभरातील दुसरा धक्का
Ajit Pawar : शर्मिला पवार यांनी सुद्धा 'आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं' आहे, असं म्हणत शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामती : अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पवार कुटुंबातील होणार विरोध अधिकच वाढला आहे. कारण आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी (Shrinivas Pawar) अजित दादांच्या भूमिकेला विरोध केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी सुद्धा 'आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं' आहे, असं म्हणत शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आधी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दादांच्या विरोध भूमिका घेतली, त्यानंतर आता श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवारांच्या भूमिकेला विरोध केला आहे.
बारामतीमधील (Baramati) काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना शर्मिला पवार म्हणाल्या की, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे. तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात. कुणाला विरोध करायचा नाही. कुटुंब म्हटले की भांड्याला भांड लागतं. पण आपल्या कुटुंबात असे कधी घडले नाही. आपण त्यावर मात करतो तसा प्रयत्न करत आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत. आपली ओळख शरद पवारांमुळे आहे. त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात, असे शर्मिला पवार म्हणाल्यात.
साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का?
वडीलधारी लोकांचा मान ठेवलं पाहिजे. साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे आई आणि वडिलांनी माझ्यासाठी काय केलं असं विचारल्यासारखे आहे. शेवटी कुटुंब वडीलधारी लोकांपासून सुरू होते. साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का? आपण त्याला कारणीभूत होऊया का? आपण त्याला गालबोट लावायचं का? असा सवाल शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. तसेच, कुणाला यश मिळत हा मुद्दाच नाही, पण आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे, असेही शर्मिला पवार म्हणाल्या.
जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही
दरम्यान याचवेळी बोलतांना श्रीनिवास पवार म्हणाले की, "जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कुणाला काही पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाले. साहेबांना म्हणायचे कीर्तन करा, घरी बसा हे काय मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले (भरणेंना टोला), औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही, जगायचं तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :