(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शरद पवारांचा विदर्भ दौरा; नागपूर, अमरावतीत मोठा पोलिस बंदोबस्त, घरावरील हल्ल्यानंतर विशेष खबरदारी
Sharad Pawar In Nagpur Amravati News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील घरावर एसटीच्या आंदोलक कामगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर या दौऱ्यात त्यांच्या विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
Sharad Pawar In Nagpur Amravati News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. नागपुरात दाखल होऊन ते अमरावतीकडे रवाना होणार आहेत. पवारांच्या मुंबईतील घरावर एसटीच्या आंदोलक कामगारांनी केलेल्या हल्ल्यानंतर या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. नागपूर आणि अमरावतीमध्येही पवारांच्या कार्यक्रमस्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तर नागपूर विमानतळावरही पोलिसांचा फौजफाटा आहे.
नागपूर विमानतळावर शरद पवार यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आलेत. त्यावर कोठडीत असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं छायाचित्र ठळकपणे दिसतंय. देशमुख यांना अटक झाल्यानंतरही पवार यांनी त्यांचं वारंवार समर्थन केलंय. या पार्श्वभूमीवर हे फलक लक्ष वेधून घेत आहेत.
शरद पवार आज एकदिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेतय दुपारी 1 वाजता शरद पवार यांचं अमरावतीत आगमन होईल. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर 4.15 वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जातील आणि सायंकाळी 5 ते 7 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
अमरावतीत शरद पवार यांच्या संवाद बैठकीत पाच जिल्ह्याचे पदाधिकारी हजर राहतील. यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री राजेंद्र शिंगणे, मनोहर नाईक, एकनाथ खडसे यांच्यासह पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्याचे प्रमुख नेते पदाधिकारी हे उपस्थित राहतील.
या संवाद बैठकीत 2 हजार लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवेश पत्र असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल. पश्चिम विदर्भात जनाधार का वाढत नाही याचं चिंतन या बैठकीत केलं जाणार आहे. मुंबई येथे सिल्वर ओक येथे झालेल्या प्रकारामुळे या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha