शरद पवार ९ जूनपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर; 'निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार दोन दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत.
मुंबई : 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. दिनांक 9 जून रोजी रायगड आणि 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. त्यामुळे शरद पवार माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन या ठिकाणी भेट देऊन तेथील आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासोबत बैठकही घेणार आहेत. त्यानंतर ते दापोलीला भेट देणार असून तिथेच ते मुक्काम करणार आहेच. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अलिबागचा दौरा केला होता.
पाहा व्हिडीओ : उद्यापासून शरद पवार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा
रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटींची मदत : मुख्यमंत्री
निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी वादळामुळे इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीनुसार मदत जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी अलिबागमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.
रत्नागिरीला 75 कोटी, सिंधुदुर्गास 25 कोटींची तातडीची मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीला 75 कोटी रुपये आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असं उद्धव ठाकरेंनी मदत जाहीर करताना सांगितलं. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र तिथलाही आढावा घेतला जाईल, त्यानंतर निर्णय घेतला घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या :
रत्नागिरीला 75 कोटी, सिंधुदुर्गास 25 कोटींची तातडीची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा