(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Nisarga | रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटींची मदत : मुख्यमंत्री
निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी वादळामुळे इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीनुसार मदत जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आज अलिबागमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.
"तातडीने जे काही करता येईल ते करण्यास सुरुवात केली आहे. पंचनाम्यांना आठ दहा दिवस लागतील. त्यानंतर नुकसानभरपाई सरकार देईलच पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडून 100 कोटी देत आहोत. याचा अर्थ 100 कोटींवर फूलस्टॉप आहे, असा नाही. जशी रायगडसाठी घोषणा केली, तसंच इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं, त्यानुसार काळजी घेणार आहोत," असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. "मी आज तातडीने रायगडला आलो, ते इथल्या लोकांचं कौतुक करायला. सरकारला मदत केल्याबद्दल धन्यवाद करायला आलो," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
"जागतिक पर्यावरण दिनालाच मला रायगडमध्ये वेगळ्या कारणाने यावं लागलं. या दिवशी मला वृक्षांची पडझड पाहायला मिळाली. दोन दिवसांपूर्वी आपण निसर्गाचं रौद्ररुप पाहिलं आणि रायगडवासियांनी ते अनुभवलं. रायगडमधल्या लोकांना दिलासा द्यायला आलो आहेच, पण त्यांचं कौतुक करायला आलोय. ही जनता भीषण तांडवाला तोंड देत होती," असं मुख्यमंत्री म्हणाले.
चक्रीवादळाचा धोका टळला तरी कोरोनाचा संकट कायम चक्रीवादळाच्या धोक्यातून बाहेर पडलो असलो तरी कोरोनाचं संकट गेलेलं नाही. अधिक मोठा धोका पुढे आहेच, असं मुख्यमंत्री म्हणाले. "अनेक ठिकाणी पडझड झाली, त्याची साफसफाई करावी लागेल. पालापाचोळा कुजेल, एखादं जनावर मेलं असेल तर ते सडण्याची शक्यता आहे. त्यामधून पुन्हा रोगराई वाढेल, त्यामुळे साफसफाई करावी लागणार आहे. वीजपुरवठा, मोबाईल सेवा पूर्ववत करायचा आहे. घरांची पडझड झाली आहे, ही कामं प्राधान्याने करत आहोत. आधीच एक संकट आलेलं असताना हे संकट आलं होतं हे न विसरता पुढचं काम करायचं आहे," असं त्यांनी सांगितलं.
वादळ पचवणं रायगडाला नवीन नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "रायगड आणि वादळ, इतिहास पाहिला तर त्यावेळी अनेक वादळं ज्यांनी पचवली त्या शिवरायांची ही राजधानी. त्यामुळे वादळ पचवणं हे रायगडाला नवीन नाही. पण यावेळचं बऱ्याच वर्षांनी आलं होतं. अत्यंत रौद्र वादळ पूर्ण ताकदीने रायगडावर धडकलं. झाडं उन्मळून पडली आहेत, वीजपुरवठा खंडित झाला आहे, मोबाईल सेवा पूर्ववत झालेली नाही, घरं, शेती आणि फळबागांचं नुकसान झालं आहे. तातडीने पंचनामे ठकरण्याचे आदेश दिले आहेत. जास्तीत जास्त लोकांना स्थलांतरित करुन सुरक्षित ठेवलं आहे."
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- आपत्ती काळात जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने प्राणहानी झाली, - हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार . - कोरोना संकट आहेच, काळजी घेतली त्यात वादळ आले,आता पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे, - प्रथम झाडांची साफसफाई करावी लागेल, आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल - रायगडला मी आज आपले कौतुक करण्यासाठी आलो आहे, - संकट सर्वांसाठी असते, पक्ष मतभेद विसरुन आपण एकत्र काम करुन रायगड जिल्हा पुन्हा उभा करु. - घरांची पडझड झाली आहे त्याना तातडीने मदत करणार. - मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल शासन मदत देणार. Cyclone Nisarga Effects | रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटींची मदत : मुख्यमंत्री