(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवार हृदयात आहेत असं बोलणाऱ्यांचं हृदय तपासावं; शरद पवारांचा टोला
राष्ट्रवादीतील तीन मोठे नेते पक्ष सोडून गेले. पक्ष सोडून जाताना मतदार संघातील कामे होत नाहीत, अशी कारणं त्यांनी दिली आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सुडबुद्धीने वागत आहेत, अशी टीका शरद पवारांना भाजपवर केली
मुंबई : राष्ट्रवादीतून सुरु असलेल्या आऊटगोईंगवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तीन नेते गेले म्हणजे मेगा भरती होत नाही. पक्ष सोडून जाताना अनेकांनी मतदार संघातील कामे होत नसल्याचं कारण दिलं आहे. त्यामुळे सरकार सुडबुद्धीने वागत असल्याची टीका शरद पवारांनी केली.
शिवेंद्रराजे मला भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, मी पक्ष सोडणार नाही. मात्र त्यांनी पक्ष सोडताना वादाचं कोणतंही कारण दिलेलं नाही. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाचा कोणताही परिणाम होणार नाही. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.
शरद पवार आमच्या हृदयात आहेत, असं बोलणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल, असा टोलाही पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांना लगावला. भाजपच्या मेगा भरतीवरही त्यांनी टीका केली. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे लोक भाजपात प्रवेश करत आहेत, त्यामुळे ही मेगा भरती नाही. अशा पद्धतीच्या घटनांचा सामना करण्याचा आपल्याला सराव असल्याचंही पवारांनी सांगितलं.
सरकार सुडबुद्धीने वागतंय
राष्ट्रवादीतील तीन मोठे नेते पक्ष सोडून गेले. पक्ष सोडून जाताना मतदार संघातील कामे होत नाहीत, अशी कारणं त्यांनी दिली आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सुडबुद्धीने वागत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील लोक मतदारसंघातील विकास व्हावा, यासाठी भाजपमध्ये गेले असल्याचं पक्ष सोडणाऱ्यांच्या बोलण्यातून दिसत आहे.
पक्ष सोडून जात आहेत, याचा त्रास होईल. मात्र काम होत नाही म्हणून ते सोडून जात आहेत, त्यांची नाळ ही मतदारांशी आहे हे चांगलं आहे. त्यामुळे चिंता नाही, असं शरद पवार म्हणाले. अजून कुणी पक्ष सोडून जाणार असल्यास त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही शरद पवार यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या
- भाजपकडून सत्तेचा गैरवापर, मात्र उत्तर कसं द्यायचं हे आम्हाला ठाऊक : शरद पवार
- चित्रा वाघ राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये का गेल्या?
- राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर, चित्रा वाघांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा
- राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती