Sharad Pawar On ED : मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीच्या कारवाईबाबत शरद पवार म्हणतात, "ED गावागावात पोहचलीय"
Sharad Pawar On ED : ईडीकडून जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. शरद पवार यावर म्हणतात...
Sharad Pawar On ED : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने (ED) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ईडीच्या कारवायांवरून केंद्रीय यंत्रणांवर आरोप करत भाजपावर टोला लगावला आहे,
आता ईडी गावागावात पोहचलीय.
काही वर्षांपूर्वी ईडी कोणालाही माहित नव्हती, आता ईडी गावागावात पोहचलीय. दरम्यान पत्रकारांनी रश्मी ठाकरेंच्या भावाची संपत्ती जप्तीबाबत विचारताच पवारांनी याबाबत मला माहित नाही असे सांगितले. भाजप या सगळ्या साधनांचा गैरवापर करत आहे, ईडीकडून जी आकडेवारी दिली ती खरी असेल तर ती स्वच्छ सांगतेय की, याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूने कोणाला तरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे 5-10 वर्षांपूर्वी इथे बसलेल्या कोणाला ईडी नावाची संस्था माहित नव्हती, आता ही ईडी गावागावात पोहचलीय. याचं कारण या सगळ्या गोष्टीचा गैरवापर आता दुर्दैवाने चालू आहे,.
जप्त केलेली मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची
ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.
पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत कारवाई
ईडीने काल प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे.