एक्स्प्लोर
Advertisement
हा महाराष्ट्र आहे, फोडाफोडी करायला हे गोवा-कर्नाटक नाही; शरद पवारांचा भाजपला इशारा
शरद पवारांनी भाजपच्या चाणक्यांना इशारा दिला आहे की, फोडाफोडीचं राजकारण करायला हे गोवा किंवा कर्नाटक नाही, हा महाराष्ट्र आहे.
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सरकार स्थापन करणार होते. परंतु राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करुन भाजपला पाठिंबा दिला. त्या जोरावर भाजपने महाराष्ट्रात सत्तास्थापन केली. परंतु भाजपकडे सत्तास्थापन करण्यासाठीचे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. कारण आज मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मित्रपक्ष आणि अपक्ष मिळून 162 आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यानी भाषण करताना उपस्थित आमदार आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनोधैर्य वाढवलं.
शरद पवार म्हणाले की, केंद्रातली सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांनी बहुमत नसताना काही राज्यात सत्ता स्थापन केली. कर्नाटक, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला बहुमत नव्हतं. परंतु तिथे भाजपने सत्तास्थापन केली आहे. काही ठिकाणी आमदार फोडून तर काही ठिकाणी अभद्र युती करुन भाजपने सत्ता मिळवली. परंतु भाजपच्या चाणक्यांनी हे लक्षात घ्यावं की, फोडाफोडीचं राजकारण करायला हा गोवा किंवा कर्नाटक नाही.
पवार म्हणाले की, गोवा, कर्नाटक, मणिपूरसह अन्य काही ठिकाणी काही लोकांनी चुकिच्या पद्धतीने सत्तास्थापन केली. तिथे काही ठिकाणी अनेक खटले सुरु आहेत. काहींचे निकाल लागलेले नाहीत. सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे भाजपने दाखवलं. परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की, आपल्याला बहुमत सिद्ध करताना कोणतीही अडचण येणार नाही. काही नव्या आमदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही.
शरद पवार म्हणाले की, अजित पवार भाजपमध्ये गेले आहेत. पक्षाविरोधात जाऊन ते सत्तेत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यावरुन आमदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. अजित पवार व्हिप जारी करतील. त्यांनी जारी केलेल्या व्हिपची अंमलबजावणी केली नाहीतर आमदारांचं सदस्यत्व रद्द होईल. त्याची आमदारांना भीती दाखवली जात आहे. परंतु ज्या व्यक्तीला पक्षाने निष्कासित केले आहे, त्याला विधीमंडळ गटनेते पदावरुन हटवले आहे. तो व्यक्ती पक्षासंदर्भातला कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्याला कोणताही आदेश देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे काळजी करु नका, कोणाचंही सदस्यत्व रद्द होणार नाही. त्याची व्यक्तिगत जबाबदारी मी घेतो.
शरद पवार यांनी सांगितले की, काही आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी आमच्याशी संपर्क केला आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप लिखित स्वरुपाचं समर्थन मिळालेलं नाही. त्यामुळे मी त्यांची इथं नावं घेत नाही. परंतु येत्या काळात त्यांचही समर्थन मिळणार आहे. त्यामुळे आपली 162 आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement