(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: गर्दी जमवून अनुकूल वातावरण करण्याचा डाव होता, खारघरच्या घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; शरद पवारांची मागणी
Kharghar Heat Stroke : अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारविरोधात अहवाल देत नाही, त्यामुळे या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत झाली पाहिजे अशी मागणी शरद पवारांनी केली.
मुंबई: खारघरच्या दुर्घटनेमध्ये अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला असून त्याची जबाबदारी ही शिंदे फडणवीस सरकारची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कडक उन्हात गर्दी जमवून आपल्याला अनुकूल वातावरण करण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांच्यामार्फत करावी अशी मागणी त्यांनी केली.
पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेताना काळजी घेता, मग या ठिकाणी का काळजी घेतली गेली नाही असा सवाल शरद पवार यांनी केला. शरद पवार म्हणाले की, "या घटनेची चौकशी आता अधिकाऱ्याच्या समितीकडून करण्यात येत आहे. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी."
सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामामध्ये 40 जवानांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. शरद पवार म्हमाले की, "देशात सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन मुलांची भांडण झाली तर ईडी मागे लावेल अशी धमकी दिली जाते. इतकी ही व्यवस्था घराघरात पोहचली आहे. अनिल देशमुख यांच्यावर खटला भरला गेला. त्यांच्यावर आरोप होता की 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि आता आरोपपत्र दाखल झालं आहे त्यात लिहिलं आहे सव्वा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यांच्या शिक्षणं व्यवस्थेला एक कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे आणि त्यासंबंधित त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. आता भूमिका घेऊन जर कोणी पुढे येतं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. नवाब मलिक यांची केस किती दिवस पुढे ढकलली जातेय? राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. मध्ये खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आपले एक सहकारी एकनाथ खडसे, त्यांनी भाजप सोडलं म्हणून त्यांच्या जावयाला तुरुंगात टाकण्यात आल आहे."
कोणावर अन्याय झाला त्याच्या मागे ताकदीने उभे राहिले पाहिजे, त्या प्रवृत्ती विरोधात लढावे लागेल. मग त्यासाठी काहीही किंमत द्यावी लागली तरी चालेल असं शरद पवार म्हणाले.