Uddhav Thackeray : मोठी बातमी : जी कारवाई नारायण राणेंवर केली, तशीच कारवाई उद्धव ठाकरेंवर करणार? शिंदे सरकारने CD मागवली
Shambhuraj Desai : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना ते राज्य चालवण्यासाठी नालायक असल्याचं म्हटलं होतं. आता त्यावरून शिंदे सरकार उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणेंवर (Narayan Rane Jail Case) जी कारवाई केली तीच कारवाई आता उद्धव ठाकरे यांच्यावर करणार असल्याचे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे तेलंगणामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याची सीडी आता मागवण्यात आली असून त्यावर कायदेशीर मतही घेतलं जाणार असल्याचंही शंभुराज देसाई म्हणाले. त्यामुळे नारायण राणे यांच्याप्रमाणे शिंदे सरकार आता उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये टाकणार का याची उत्सुकता आहे.
जो व्यक्ती आपल्या राज्यात शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता शंभुराज देसाईनी प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणेंप्रमाणे कारवाई करणार
शंभुराज देसाई म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरलाय. याबाबत मी त्यांच्या वक्तव्याची सीडी मागवली आहे. ही सीडी कायदेतज्ञांकडून तपासू आणि पुढील निर्णय घेवू. के मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांच्याबाबत त्यांनी काय केले होते हे सर्वांनी पाहिले होते."
उद्धव ठाकरेंनी मुख्ममंत्र्यांबद्दल नालायक असा शब्दप्रयोग केल्यानंतर आता शंभुराज देसाई म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत जे स्टेटमेंट आहे, त्याबाबत मी व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप मागवणार आहे. ते पाहून मी कायदे तज्ज्ञांना दाखवणार आहे. राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या मुख्यमंत्र्यांबाबत असा शब्दप्रयोग याआधी त्याच पदावर बसलेल्या व्यक्तीने करणे, ते ज्यावेळी मुख्यमंत्रिपदी होते, त्यावेळी त्यांच्याबाबत ज्यांनी वक्तव्य केलं होतं (नारायण राणे) त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेतली, तीच भूमिका आम्हाला घेणं शक्य आहे, आम्ही व्हिडीओ-ऑडिओ क्लिप बघून आम्ही त्याबाबत जरुर विचार करु."
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका आणि त्यानंतर शंभूराज देसाईंनी दिलेले प्रत्युत्तरानंतर आता शिवसेनेतील दोन्ही गटातील वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
महाराष्ट्रात सरकार नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. मोदी महाराष्ट्रात का येत नाही? शेतकऱ्यांकडे देखील बघत नाहीत. राज्यात काही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला त्यासाठी काय केलं? मुंबईत पाण्याचा नाश होत आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं या सरकारचा तेरावा महिना आहे. गद्दारांचे पुनर्वसन कसं करायचं यावरच त्यांचं लक्ष आहे. जो व्यक्ती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय. असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही बातमी वाचा:
VIDEO : शंभुराज देसाई पत्रकार परिषद