Rahul Shetty Murder : शिवसेना नेता राहुल शेट्टीच्या हत्येचा कट रचणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
शिवसेना पक्षाचे माजी लोणावळा शाखाप्रमुख राहुल उमेश शेट्टी यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी सुरज विजय अग्रवाल याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
लोणावळा, पुणे : शिवसेना पक्षाचे माजी लोणावळा शाखाप्रमुख राहुल उमेश शेट्टी (Rahul Umesh shetty) यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी सुरज विजय अग्रवाल याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील काही आरोपींना यापूर्वी जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे मुख्य आरोपीलादेखील जामीन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. राहुल शेट्टी यांची 26 ऑक्टोबर 2020 रोजी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने अग्रवालची जामीन याचिका फेटाळली होती...
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी मुख्य आरोपी असलेल्या सुरज विजय अग्रवालला सशर्त जामीन मंजूर केला असून, त्यासाठी काही अतिरिक्त अटीदेखील घातल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर 2022 रोजी अग्रवालची जामीन याचिका फेटाळून लावली होती. राहुल शेट्टी आणि आरोपी असलेला सुरज विजय अग्रवाल या दोघांमध्ये राजकीय वैर होते. याच कारणामुळे त्याने राहुल शेट्टी यांची हत्या करण्याचा कट रचला होता.
वडगाव मावळ परिसरात प्रवेश करण्यास बंदी
अतिरिक्त अटीनुसार, सुरज विजय अग्रवाल याला न्यायालयीन सुनावणीसाठी वगळता वडगाव मावळ परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरज विजय अग्रवाल हा केवळ तेथील स्थानिक कोर्ट मध्ये सुनावनी असेल तरच जाऊ शकेल. महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिनिधींनी न्यायालयात केलेल्या विरोधाची दाखल घेत, हा निर्णय घेण्यात आला आहे
शिवसेना नेते हॉटेलमध्ये बसून चहा पीत होते अन्..
शेट्टी हे लोणावळा शहरातील शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख होते. त्यांचे वडील उमेश शेट्टी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते. 26 ऑक्टोबर 2020 रोजी राहुल शेट्टी जयचंद चौकातील हॉटेलमध्ये चहा पीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्यावर जवळून तीन गोळ्या झाडल्या, त्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले होते.
अग्रवाल आणि राहुल शेट्टी यांच्यात राजकीय वैर ...
दोघांमध्ये राजकीय आणि वैयक्तिक वाद असल्याचं तपासात समोर आलं होतं. अनेक दिवसांपासून त्यांच्यात राजकीय वाद होते. याच वादातून एक दिवस चौकात चहा पित असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. 1986 मध्ये शिवसेनेचे सदस्य असलेले शेट्टी यांचे वडील उमेश शेट्टी यांची देखील मावळमध्ये हत्या झाली होती. त्यांच्या हत्येमागचं कारण देखील राजकीय वैमनस्य असल्याचं समोर आलं होतं.
इतर महत्वाची बातमी-
Amol Kolhe : 4000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळायलाच हवा; खासदार अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम