Amol Kolhe : 4000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळायलाच हवा; खासदार अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम
कांदा फेकून दिला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना जाग आली नाही का? आता आम्हाला 4 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळायलाच हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुणे : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क(onion) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या निर्णयाने शेतकरी समाधानी नसल्याने अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम आहेत. कांदा फेकून दिला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना जाग आली नाही का? असा सवाल उपस्थित करत आम्हाला 4 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळायलाच हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे चुकीचे कृषी धोरण आहे, म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पुण्यातील आळे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत आहे. निर्यात शुल्क आकारण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालावणारा आहे. त्यामुळंच केंद्र सरकारच्या या धोरणाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, म्हणूनच आम्ही रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला असल्याचं कोल्हे यांनी म्हटलंय.
सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी धोरणं राबवली जात आहे. कांद्यामुळे शेतकऱ्यांना नफा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आणि सात आठ महिने पुरेल एवढा कांदा देशात उपलब्ध असताना मोदी सरकारने शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं आहे. कांद्यावर जे निर्यात शुल्क लावण्यात आलं आहे. ते अघोषित निर्यात बंदी आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळमधून टोमॅटो आयात करुन टोमॅटोचे भाव पाडले आणि आता कांदा आयात करुन कांद्याचे भाव पाडण्याचं पाप हे मोदी सरकार करत असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारमध्ये जे लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनावेळी आळे फाटा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त करुन शेतकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण करायचं आहे. या सरकारला राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा आहे. दिल्लीत शेतकऱ्यांना वर्षभर आंदोलन करावं लागलं त्यानंतरच कृषी कायदे मागे घेण्यात आले होते. शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनं पिकवणं बंद केलं तर सगळ्यांचे खायचे वांदे होतील, असं म्हणत त्यांनी सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कांद्याची माळ घालून स्वागत...
काद्याचा प्रश्न सध्या चांगलाच पेटताना दिसत आहे. त्यातच अमोल कोल्हेंनी आंदोलन छेडलं आहे. केंद्रातील कोणतेही मंत्री ज्यावेळी राज्यात येईल त्यावेळी त्यांचं कांद्याचा हार घालून स्वागत करण्यात येईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दु:ख केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांना समजावं यासाठी त्यांचं अनोखं स्वागत करणार असल्याचं कोल्हेंनी सांगितलं आहे.
आंदोलनावर ठाम...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. मात्र फडणवीसांच्या निर्णयानंतर शेतकरी समाधानी नसल्याने अमोल कोल्हेंचं ठिय्या आंदोलन सुरुच राहणार आहे.
इतर महत्वाची बातमी-