राज्यातील जुनी झाडं वाचवण्यासाठी सयाजी शिंदे सरसावले, फोटोसहीत माहिती पाठवण्याचं आवाहन
सयाजी शिंदे सह्याद्री देवराई- 7972395655 आणि 9096644671 यावर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जूनं आहे, ते कुठे आहे. ही माहिती लिहून व्हॉट्सॲप करायची आहे. या चळवळीतून राज्यभरातील सर्व जुन्या झाडांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.
मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी आज एका अनोख्या उपक्रमाची घोषणा केली. राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत. त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराई कडून दोन मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. सयाजी शिंदे सह्याद्री देवराई- 7972395655 आणि 9096644671 यावर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जूनं आहे, ते कुठे आहे. ही माहिती लिहून व्हॉट्सॲप करायची आहे. या चळवळीतून राज्यभरातील सर्व जुन्या झाडांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज मुंबईतील कमला नेहरू पार्क येथील जवळपास 150 वर्षे जुनं असलेल्या मंकी इअर पॉड नावाच्या झाडापासून करण्यात आली.
या उपक्रमाबाबत बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, शाळेतील लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं. झाडं एक संत आहे एक देवचं आहे. त्यामुळे जे जे श्वास घेतात त्यांनी त्यांना माहिती असलेलं जुनं झाड शोधा, त्याच्याबरोबर फोटो काढा, त्याचं ठिकाण लिहा आणि तो सयाजी शिंदे सह्याद्री देवराईकडून देण्यात आलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. ही चळवळ महाराष्ट्रातील जुन्या झाडांची माहिती गोळा करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून ही झाडे कुठे आहेत? त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे? याची माहिती गोळा होईल. या माहितीचा वापर करून या झाडांचं आपल्याला जतन करता येईल. 2 जुलैच्या आत ही संपूर्ण माहिती सह्याद्री देवराईच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायची आहे. या चळवळीतून गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वात जुनी झाडे आपल्याला मिळणार आहेत आणि आपण या झाडांचं सेलिब्रेशन करणार आहोत.
या चळवळीबाबत बोलताना चित्रपट लेखक अरविंद जगताप म्हणाले की, ही संकल्पना सुरू करण्यापुर्वी अनेक ठिकाणाहून ऐकायला मिळायचं की, आमच्या गावात आंब्याचं झाडं नाही. गावात आंब्याचं झाडं नाही यासारखी दुर्दैवी बाब नाही. अगोदर गावं स्वावलंबी होती. म्हणजे काय होतं तर त्यांच्याकडे झाडे होती. प्रत्येक फळ गावातल्या गावात मिळायचं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता अशी झाडं नाहीत म्हणजे आपण आता आत्मनिर्भर नाही होऊ शकू. आपण पूल बांधून आणि सिमेंटचे रस्ते बांधून आत्मनिर्भर नाही होऊ शकत. त्यासाठी झाडं असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती झाडं असली पाहिजेत. ती जपली पाहिजेत. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की, गावातल्या कार्यकर्त्यांना होर्डिंग बघायची केवळ सवय आहे. अनेकांना पुढाऱ्याचा कुत्राही माहिती असतो परंतु गावातील झाडं मात्र माहिती नसतं. ही दुर्दैवी बाब आहे. लहान मुलांना तर कार्टून वाहिन्यांवरील सर्व पात्र माहिती आहेत. पण झाडांची नावं पाठ नाहीत. मला वाटतं सर्वांनी झाडांना सेलेब्रिटी बनवायला हवं. झाडांना मंदिरं बनवायला हवीत आणि त्याची सुरुवात या आषाढी एकादशी पासून करू.