(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी घाला, येणाऱ्या सात पिढ्या आशीर्वाद देतील; सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी
राजस्थान, नवी दिल्ली, बंगाल या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या फटाक्यांवर बंदी आणावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुंबई : राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी, असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री म्हणून मागणी केली होती. अशातच आता अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या फटाक्यांवर बंदी आणावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. हा निर्णय घेतल्यामुळे आता काही घटकांचे नुकसान होईल, पण पुढील पिढ्यांचा विचार करून ही बंदी आणली पाहिजे, असंही सत्यजित तांबे म्हणाले आहेत.
मोठा आवाज़ करणाऱ्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी घाला, येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशिर्वाद देतील!@satyajeettambe #Diwali2020 pic.twitter.com/SO9Zgt4qwN
— ABP माझा (@abpmajhatv) November 6, 2020
सत्यजित तांबे म्हणाले की, 'राजस्थान, नवी दिल्ली, बंगाल या सगळ्या राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय तेथील राज्यसरकारनं घेतला आहे. खरं पाहिलं तर फटाक्यांमुळे वायूप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असतं. म्हणून माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी महाराष्ट्रातही जास्त धूर होणाऱ्या आणि जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांवर कायमची बंदी आणली पाहिजे.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मला कल्पना आहे की, यामुळे व्यापारी वर्ग सहभागी असेल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर मलाही खरेदी केला असेल. पण पुढिल सात पिढ्यांचा विचार करून, आपल्याला आता थोडं नुकसान झालं तरी चालेल, पुढच्या पिढ्यांसाठी फटाक्यावरील बंदी आलीच पाहिजे.'
महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार का?
राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री मागणी केली. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. 5 नोव्हेंबर रोजी टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.
मुंबई महापालिकेकडून फटाके फोडण्यावर निर्बंध
यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेने निर्बंध घातले आहे. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. सोसायटी आणि घराच्या आवारातच फटाके फोडा असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. नियमावलीचं उल्लंघन केल्यास मुंबई महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कारवाई होणार आहे.
दिवाळीच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या
- कोरोना संदर्भात असलेल्या SOP चे पालन करावे
- दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
- दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.
- धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही, त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.