जुगारी अड्ड्यामुळे कोरोनाचा प्रसार होतोय का? साताऱ्यातील घटनेमुळे प्रश्न उपस्थित
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या जुगारींची आकडेवारी वाढत गेली. काहीजण वन डे पास काढून साताऱ्यात कारण दाखवून येतात, ही बाब समोर आली होती
सातारा : कोरोनाचा फैलाव होत असताना जुगार खेळणारी मंडळी लॉकडाऊनची आयशी तैशी करुन सहज पुणे-सातारा, सातारा-पुणे करत असल्याच समोर आलं आहे. राज्यात सुरु असलेल्या जुगारातील प्रमुख दोन प्रकार जे कधीच बंद होऊ शकत नाहीत, ते म्हणजे मटका आणि पत्ते. मात्र सध्या कोरोनाच्या महामारीत या जुगारीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याच चित्र दिसू लागल आहे.
काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एका आलिशान बंगल्यात सातारा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत डझनभर आरोपी जेरबंद केले. नेहमीच्या स्टाईलने पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मात्र मोठी धक्कादायक बाब समोर आली. या आरोपींमधील जवळपास सर्वच आरोपी हे पुणे जिल्ह्यातून ई-पास न घेताच सातारा जिल्ह्यात आल्याच उघड झाले. पोलिसांनी त्यांच्या आलिशान गाड्या जप्त केल्याच शिवाय रोख रक्कमही जप्त केली.
या धाडीकडे इतरवेळी जास्त लक्ष वेधलं गेलं नसतं. मात्र सध्याच्या या कोरोनाच्या फैलावात पुण्यातून आलेल्या मंडळींनी सर्वांचे डोळेच उघडायला लावले. पाच दिवसापूर्वी ज्या लोकांना स्वत:च्या बहिणीच्या अंतविधीला साताऱ्यातून कोल्हापूरला जाता आले नाही. तेथे या अशा धनदांडग्या जुगाऱ्यांना मात्र पुण्यातून साताऱ्यात जुगार खेळण्यासाठी प्रवेश मिळावा, हे मोठं गौडबंगाल पुढे आलं.
या सर्व गोष्टीचा उलघडा करण्यासाठी माझाने एका मोठ्या खेळाडूला गाठले. त्याने दिलेली माहिती धक्कादायक होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या जुगारींची आकडेवारी वाढत गेली. काहीजण वन डे पास काढून साताऱ्यात कारण दाखवून येतात. ही बाब समोर आलीच शिवाय काही मंडळी ई-पास न काढताच मांडवली करुन नाके पास करुन जुगार खेळायला येतात हे समोर आले. आता जुगाऱ्यांच्या आलिशान गाड्या जर असतील, तर यांच्या गाडीतल्या रक्कमांची आकडेवारी काय असेल? याचा विचार न केलेलाच बरा.
मात्र या सर्व गोष्टी बाहेर येत असताना, एका ठिकाणी जुगार अड्डा असेल तर त्या जुगारीच्या अड्ड्यावर चार टेबल असतात. आणि जर चार टेबल असतील तर त्या अड्ड्यावर जवळपास शंभर लोकांचा वावर असतोच असतो. आणि या शंभर लोकांचा वावर असा काही असतो की, मांडीला मांडी लाऊन बसलेले असतात. शिवाय पत्ते पिसताना आणि पत्ते वाटताना तोंडातील थुंकी त्या पत्याच्या पानाला लावल्याशिवाय पान हातात घेता येत नाही. आता ही मंडळी एका पत्त्याच्या कॅटवर दहा-दहा, बारा-बारा तास एकत्र असतील तर काय होऊ शकते. एक बाधित असेल तर एकाच वेळी या पत्त्याच्या मैफिलीतून किती बाधित तयार होऊ शकतात हे स्पष्ट दिसते.
अशा या जुगाऱ्यांमुळे अनेक गावात फटाक्यांची माळ लागावी, तशी कोरोनाची माळ लागत गेली. यात फक्त भाजीपाला आणायला पुण्याला गेलो, दुकानाचा माल आणायला पुण्याला गेलो होतो असे प्रशासकीय यंत्रणेला सांगून कायद्याच्या चौकटीतून वाचण्याचा तो बाधित प्रयत्न करतो. मात्र त्याच्या या जुगारीच्या पत्त्यातून त्याचं कुटुंब आणि कुटुंबाबरोबर आजूबाजूची घर बाधितांच्या लिस्टकडे वळलेली असतात. निभ्रष्ट असणाऱ्या वरिष्ठ पोलिसांना या सर्व गोष्टीचा उलघडा करायचा असेल तर त्यांनी अशांची माहिती डमडाट्यातून काढली तर जुगाऱ्यांची माळ त्यांच्या समोर नक्कीच येईल.
जुगारीतून कम्युनिटी स्प्रेडिंगचा प्रकार पोलिसांनी थांबवण्यासाठी सातारा जिल्ह्यातच राहणारे गृहमंत्री शंभुराज देसाई यांनी वाईच्या प्रकरणात सखोल चौकशी करण्याबाबत आपण एसपींसोबत बोलत असल्याचे सांगितले आहेच. शिवाय, साताऱ्यातील फैलाव जर थांबवायचा असेल तर यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी या जुगारीकडे स्वत: लक्ष घातले पाहिजे. हे तितकेच सत्य असले तरी गृहमंत्र्यांनीही संपूर्ण राज्यातील जुगारीच्या अड्ड्यांबाबत लक्ष घातले तर या वाढत्या साखळीला रोखण्यात कोठेतरी हातभार लागेल हे नक्की.