संतोष देशमुख हत्याप्रकरण! आरोपींना साहित्य पुरवणाऱ्या बालाजी तांदळेचे सीसीटीव्ही फुटेज समोर, धनजंय देशमुखांचे आरोप
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आणखी महत्वाची माहिती समोर आली आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना साहित्य पुरवणारा बालाजी तांदळे याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
Santosh Deshmukh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्याप्रकरणात आणखी महत्वाची माहिती समोर आली आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना साहित्य पुरवणारा बालाजी तांदळे याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. बीड शहर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांना बालाजी तांदळेने धमकावले होते. त्याच बालाजी तांदळेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालाजी तांदळे आरोपींसाठी ब्लॅंकेट खरेदी करताना दुकानामध्ये दिसत आहे.
बालाजी तांदळेने सीआयडी ऑफिसर असल्याची सांगत घेतली वाल्मिक कराडची भेट
बालाजी तांदळे याने सीआयडी ऑफिसर असल्याची बतावणी करत बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडला भेटण्यासाठी एन्ट्री केली होती. यावेळी तो वाल्मीक कराड याला भेटल्याचा आरोप देखील धनंजय देशमुख यांनी केला होता. तर यावेळी बालाजी तांदळे याने सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून धमकावल्याची तक्रार देखील धनंजय देशमुख यांनी केली होती. याच बालाजी तांदळेने आरोपी विष्णू चाटेला पाण्याच्या बॉटल्स न्यायालयात दिल्याचे समोर आले होते. आता विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यादरम्यान त्यांना लागणारे साहित्य बालाजी तांदळेने एका दुकानातून खरेदी केले. याचाच हा सीसीटीव्ही समोर आला आहे. हे पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींसाठी ब्लॅंकेट घेतले होते असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
राज्यात एकीकडे सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला त्यातील आरोपी प्रशासनानं काही तासात शोधून काढला. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मीक कराडला शोधण्यासाठी 20 - 20 दिवसांचा अवधी लागला. दुसरीकडे याच प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तो काय देश सोडून गेला असेल का? शासनाच्या नाकर्तेपणामुळेच प्रकरणात दिरंगाई होत आहे. यात पोलीस प्रशासनाचा कुठलाही दोष नाही. नैतिकता म्हणून तरी या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. यात कदाचित उद्या वाल्मीक कराड हे निर्दोष निघाले तर त्यांनी पुन्हा आपले मंत्रीपद स्वीकारावे. अशी मागणी ही मराठा आंदोलकांनी केली आहे. शासनाला आम्ही वारंवार मागणी केली आहे की, जो फरार आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक केली जावी. तसेच जे आरोपी पकडले आहेत त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे.