Sanjay Raut: भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली, संजय राऊतांचा गंभीर आरोप
शिवसेनेचे तत्कालीन सर्व खासदार अयोध्येच्या भूमीवर होते आणि सगळे त्या केसमध्ये आरोपी आहेत. तुम्ही तर तेव्हा बिळात लपले होते, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : भाजपवाले (BJP) सगळे ब्रिटिशांचे मुखाबीर होते, भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही कुठे होते? असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, देशाचा इतिहास फार मोठा आहे आणि भाजपच्या लोकांना त्या इतिहासाशी काही देणं नाही. भाजपचे लोक कधीच पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाही. यांचं म्हणणं आहे की, देश 2014 साली जन्माला आला मी तर म्हणतो की भाजपच 2014 साली जन्माला आला आहे. बाबरी एपिसोड त्या आधीचा आहे.
बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचे तत्कालीन सर्व खासदार अयोध्येच्या भूमीवर : राऊत
भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी सांगितलं होतं की, बाबरी पाडणारे शिवसेनेचेच लोक होते. आम्ही लोणचं, चटणी काहीही असलो तरी पळपुटे नाही. तुम्हीच रणछोडदास आहात. तुम्ही युद्धात मैदानवर कुठे आहे ते सांगा आणि मग लोकांची पापड, लोणची विका. शिवसेनेचे तत्कालीन सर्व खासदार अयोध्येच्या भूमीवर होते आणि सगळे त्या केसमध्ये आरोपी आहेत. तुम्ही तर तेव्हा बिळात लपले होते, असे संजय राऊत म्हणाले.
राम मंदिर राजकारणाचा विषय नाही आस्था श्रद्धेचा विषय : राऊत
संजय राऊत म्हणाले, राममंदिर हा अस्मितेचा विषय आहे, राजकारणाचा नाही. हजारो कारसेवक शहीद झाले, तर अनेकांना शरयुत फेकून दिलं होतं. राम मंदिर राजकारणाचा विषय नाही आस्था श्रद्धेचा विषय आहे. रामापेक्षा मोठं कुणीच नाही. राम मंदिर कुणाच्या बापाचं नाही, कुणाच्या मालकीचं नाही. मणिपूरमधे काय झालं तुम्हाला माहिती नाही का? तुम्हीच अपशकुनी आहात. ईव्हीएम आहे तोपर्यंत तुम्ही आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. शिवसेनेचे योगदान आम्हाला विचारता, तुम्ही त्यावेळी कोणत्या बिळात होतात हे आम्हाला माहिती आहे.
इंडिया आघाडीला कुठल्याही चेहऱ्याची गरज नाही : राऊत
इंडिया आघाडीला कुठल्याही चेहऱ्याची गरज नाही. आम्ही देशातील तानाशाहचा चेहरा पुढे आणण्यासाठी आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगतो जिंकेल त्याची जागा आहे हे आमचं सूत्र आहे. जागा वाटपासंदर्भात आमच्यात ओढाताण होणार नाही. हुकूमशाहीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्रित लढणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.