Sanjay Raut Press Conference : मनसे-भाजप युती होणार? शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut Press Conference : शिवसेना मेरिटमध्ये आलेला पक्ष आहे. म्हणूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री सध्या राज्यात आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीकास्त्र डागलं आहे.
Sanjay Raut Press Conference : विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवारांनी पुढे यावं असं पुन्हा एकदा संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना मेरिटमध्ये आलेला पक्ष आहे. म्हणूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री सध्या राज्यात आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेवर टीकास्त्र डागलं आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीची शिवसेना 'ढ' टीम आहे, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊतांनी मनसेवर पलटवार केला आहे.
मनसे (MNS) आणि भाजपच्या (BJP) युतीबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "त्याविषयी फार काही बोलावं, अशी काही स्थिती महाराष्ट्रात, देशाच्या राजकारणात नाही. रात गई, बात गई. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या सर्व महापालिका शिवसेना ताकदीने लढेल." पुढे बोलताना मुंबई महापालिका शिवसेना जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, अशा भेटीगाठी होत असतात. आम्हीही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेकजण येतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असतं असं नाही. त्यावर आम्ही बोलावं असं काही नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
"मुंबई पालिकेवरचा भगवा झेंडा कितीही असंतृष्ट आत्मे एकत्र आले, मराठी माणसं, मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात कितीही कटकारस्थानं केली, तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही पालिका जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही षडयंत्र रचली तरी काही फरक पडत नाही.", असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
पाहा व्हिडीओ : कितीही कटकारस्थान जिंकली तरी मुंबई महापालिका शिवसेनाचं जिंकणार
चंद्रकांत पाटलांनी मतदारांच्या मागेही ईडी लागू शकते, असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कोल्हापूरच कशाला… गोव्यातील पणजी, साखळी मतदारसंघातील मतदारांच्या मागे आधी ईडी लावा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील असे काही मतदारसंघ मी सांगू शकतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरी काही मतदारसंघात ईडी लावणं गरजेचं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "चंद्रकांत पाटील यांनी फार चांगली सूचना केली आहे. त्यामुळे गोव्यात उत्पल पर्रीकरांचा पराभव झाला. तो पणजी आणि प्रमोद सावंत जिंकले तो साखळी या दोन मतदारसंघातील मतदारांची ईडी चौकशी लावली तर आम्ही स्वागत करु. चंद्रकांत पाटीला यांचं वक्तव्य चांगलं आहे, महाराष्ट्राचं नंतर पाहू काय करायचं. पण सुरुवात पाच राज्यातील निकाल, मतदारांवर निर्माण केलेला प्रभाव याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील यांना यात पुढाकार घेतला तर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढाईत उभा राहीन."
गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांकडे युपीए अध्यक्षपद सोपवावं अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर युपीए अध्यक्षपदात आपल्याला रस नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "शरद पवार हे फार मोठे नेते आहेत, आम्ही सर्वच त्यांचा सन्मान, आदर करतो. देशातील विरोधी पक्षाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशातील समविचारी पक्ष एकत्र यावेत यासाठी काही भूमिका ठरत आहेत. शरद पवारांच्या सक्रीय सहभागाशिवाय एकजुटीचं पाऊल पुढे जाणार नाही. शरद पवारांच्या मनात काय आहे, आम्हाला माहिती असतं." पुढे बोलताना ते म्हणाले की, "शरद पवारांच्या प्रयत्न, पुढाकाराशिवाय या देशात मोदींना पर्याय तसंच विरोधी पक्षांची एकजूट होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट आहेत. या एकजुटीचं नेतृत्व करण्यासाठी देशात अनेक विरोधी नेते आहेत जे सक्षम आहेत, पण पुढाकार घेण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पुढे यावं असं आमचं मत आहे.".
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sandeep Deshpande : शिवसेना राष्ट्रवादीची 'ढ' टीम; आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मनसेचा पलटवार