महाविकास आघाडी म्हणजेच, 'मिनी यूपीए'; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut Press Conferance : गोवा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला साथ द्यायची की, नाही? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut Press Conferance : राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे, 'मिनी यूपीए' असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांचं हे वक्तव्य मोठं राजकीय वक्तव्य मानलं जात आहे. अशातच गोवा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला साथ द्यायची की, नाही? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "युपीएमध्ये शिवसेना जातेय किंवा आणखी काहीतरी आघाडी होतेय, या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. आम्ही ते वृत्तपत्रांमधून वाचतो किंवा मीडियातून ऐकतो. राहुल गांधींना आज मी नक्कीच भेटणार आहे. पण त्याला तुम्ही कर्टसी व्हिजिट का म्हणत नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादील काँग्रेससोबत सत्तेत सहभागी आहे. एकमेकांच्या मदतीनं समान नागरि कायद्यावर आम्ही सरकार चालवतोय. सरकार उत्तम चाललं आहे. तिनही पक्षांमध्ये संवाद असावा असं आम्हाला वाटतं. त्यानुसार, मी दिल्लीत असलो किंवा ते दिल्लीत असले की, आम्ही एकमेकांना भेटून चर्चा करतो. महाराष्ट्रातील राजकारणावर, सरकारच्या कामकाजावर आणि एकंदरीत देशाच्या भविष्यातील घडामोडींवर."
महाविकास आघाडी म्हणजेच, 'मिनी यूपीए' : संजय राऊत
"शिवसेना युपीएचा भाग बनणार का? यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आम्ही कोणाचा भाग व्हायचं, किंवा कोणाचाही भाग झाल्याशिवाय आम्ही तीन पक्ष महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून राज्यात सत्तेत आहोत. युपीए म्हणजे, काय असतं नक्की? भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येतात. सत्ता स्थापन करतात. एनडीएही याच पद्धतीनं चाललं. वाजपेयींच्या नेतृत्त्वाच एनडीएमध्येही अनेक विचारधारांचे पक्ष होते. त्यामध्ये राम मंदिराला विरोधक करणारेही पक्ष होते. महाविकास आघाडीतही असेच भिन्न विचाराचे तीन पक्ष आहेत. महाराष्ट्रात प्रयोग सुरु आहे, तो मिनी युपीएचाच प्रयोग आहे", असं राऊत म्हणाले. "युपीए किंवा विरोधी पक्षांची आघाडी आहे, त्यांनी अधिक मजबुतीनं पुढे यावं. त्यात जास्तीत-जास्त पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. आणि पर्याय उभा केला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांसोबतच शरद पवारांचीही भूमिका आहे.", असंही राऊतांनी स्पष्ट केलं.
पाहा व्हिडीओ : Sanjay Raut : भाजपविरोधातील आघाडी अधिक मजबूत झाली पाहिजे ही पवार, ठाकरेंची भूमिका : संजय राऊत
5 राज्यांत निवडणुका, गोव्यात शिवसेना निवडणूक लढणार : संजय राऊत
"5 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामध्ये गोव्यात निवडणूक लढवण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही साधारण चाचपणी करतोय. अशावेळेला काँग्रेस उत्तर प्रदेशात आणि गोव्यात निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आजच्या भेटीत यासंदर्भात काही चर्चा झाली तर मी नक्कीच चर्चा करिन.", असं संजय राऊत म्हणाले.
"शिवसेना गोव्यात स्वतंत्र जागा लढण्यासंदर्भात चाचपणी करतेय. मी कालच असं पाहिलं की, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली आहे. त्यांची आघाडी स्थापन झालेली आहे. पण ज्याअर्थी शिवसेना त्या आघाडीत नाही, त्या अर्थी शिवसेनेला त्या आघाडीत जायचं नाही. गोव्याच्या जनतेची मानसिकता तृणमूल काँग्रेसपेक्षाही जास्त शिवसेनेला माहीत आहे. गोव्यात काय होईल, हे तृणमूलपेक्षा जास्त शिवसेनेला माहीत आहे. महाराष्ट्र आणि गोव्याचं एक नातं आहे. सांस्कृतिक, सामाजिक, भावनिक, भौगोलिकही. कलकत्त्याहून आलेला पक्ष गोव्यात निवडणूक लढतोय ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष काय अवस्था आहे, हेसुद्धा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे एकवेळ आम्ही स्वतंत्र लढू. पण कोणत्या आघाडीसोबत जाण्यापूर्वी 100 वेळा विचार करु. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लक्ष ठेवून आहेत.", असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी तर उद्या प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. विशेषतः उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेसला मदत करणार का? याकडं लक्ष लागलंय.