16 वर्षीय विद्यार्थ्याला दारू पाजायची, फाईव्ह स्टार हॉटेलात न्यायची; मुंबईतील शिक्षिकेचा धक्कादायक स्कँडल
याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महिला शिक्षिकेडून एका 16 वर्षीय विद्यार्थ्यावर 1 वर्षापेक्षा अधिक काळ लैंगिक अत्याचार सुरू होता.

मुंबई : राजधानी मुंबई (Mumbai) ही क्राइम कॅपिटलही होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दररोज गुन्ह्यांची वेगवेगळी मालिकाच या शहरात सुरू आहे. त्यामध्ये, शाळेत घडणाऱ्या घटनाही चर्चेत आहेत. आता, येथील एका नामांकित इंग्रजी शाळेतील शिक्षिकेला (Teacher)अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय, ती शिक्षिका विद्यार्थ्याला दारू पाजायची, आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची. या हॉटेलमध्येच (Hotel) याचे लैंगिक शोषण करायची, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, महिला शिक्षिकेडून एका 16 वर्षीय विद्यार्थ्यावर 1 वर्षापेक्षा अधिक काळ लैंगिक अत्याचार सुरू होता. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयास मुलाच्या वागण्यातील बदल दिसून आल्यानंतर त्याच्याकडे विचारणा केली असता ही धक्कादायक बाब समोर आली. मुलाने आपल्या आई-वडिलांसमोर लैंगिक अत्याचाराबद्दलची माहिती उघडपणे बोलून दाखवली. मात्र, तरीही हे कुटुंब गप्प राहिले. इयत्ता 10 वीचे वर्षे संपायला काहीच महिने शिल्लक असल्याने कुटुंबीयांनी ही बाब लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. शाळेतून बाहेर पडल्यानंतर तरी संबंधित शिक्षिका आपल्या मुलाचा पाठलाग थांबवेल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, 10 वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही ती शिक्षिका त्याला सोडत नव्हती. शिक्षिकेने घरकाम करणाऱ्या महिलेच्या माध्यमातून पुन्हा त्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे प्रकरण पुन्हा वाढले. शिक्षिकेने, भेटायचे आहे असा मेसेज मुलासाठी पाठवला. त्यानंतर, "कुटुंबाने आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला," अशी माहिती पोलिसांनी दिली.
कधी झाली सुरूवात?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिका 40 वर्षांची विवाहित असून तिला एक मूल देखील आहे. डिसेंबर 2023 मध्ये हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान ती विद्यार्थ्याच्या अनेकवेळा संपर्कात आली. त्यानंतरच ती त्याच्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये तिने पहिल्यांदाच विद्यार्थ्याला नात्यासाठी विचारणा केली. सुरुवातीला विद्यार्थ्याने अंतर राखण्यास सुरुवात केली. मात्र, शिक्षिकेने शाळेतील तिच्या एका महिला मैत्रिणीची मदत घेत प्रकरण पुढे नेलं. या प्रकरणी महिला मैत्रिणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनले आहेत, वयस्कर महिला आणि मुलांमधील संबंध सामान्य आहेत, असे मैत्रिणीने विद्यार्थ्याला पटवून दिले होते. आपल्या एका मित्राशी बोलल्यानंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी, पोलीस अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की, 'ती (शिक्षिका) विद्यार्थ्याला तिच्या कारमधून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढून विनयभंग केला. 'पुढील काही दिवसांत, विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला, म्हणून त्याला तिने गोळ्याही दिल्या. त्यानंतर, शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली, त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. शिक्षिकाने अनेकवेळा विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी त्याला दारू देखील पाजत होती. याप्रकरणी, आरोपी शिक्षिकेला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा
सोसायटीत 4 फ्लॅट, 50 लाखांचा व्यवहार; पोलिसांच्या जाचामुळे बिल्डरने संपवलं जीवन, तिघांना अटक
























