(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangola : मोदी गेला आता सोन्या मिळवून देतोय वर्षाला कोटभर रुपये, सांगोल्यातील मेंढ्याची पुन्हा चर्चा
मेटकरी यांचा सर्जा हा मेंढा देशभरात प्रत्येक बाजारात अव्वल येऊ लागल्याने त्याला मोदी हे नामकरण केले होते. याच मोदीचा मेंढा असलेला सोन्या आता पुन्हा चर्चेत आला आहे.
पंढरपूर : एक वर्षांपूर्वी सांगोल्यामधील बाबू मेटकरी यांच्या मोदी या मेंढ्याची देशभर चर्चा झाली होती. माडग्याळ जातीच्या या मेंढ्याला 71 लाखाची मागणी झाल्याने मुलाचा सर्जा आणि नंतर मोदी नामकरण झालेला मेंढा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. दुर्दैवाने या मोदी मेंढ्याचे कोरोना काळात निधन झाले. आता त्याचे पिल्लू असलेल्या सोन्याला आता सोन्याच्या भावात मागणी येऊ लागली आहे . विशेष म्हणजे या सोन्या सोबतची पिल्ले 10 ते 15 लाखाला एक याप्रमाणे विकली होती. मात्र बाबू यांनी सोन्या आणि त्याच्या जोडीचे एक पिल्लू ठेवले आणि आज त्यालाच 55 लाखांची किंमत आली आहे .
गेल्यावर्षी एका पात्राच्या घरात राहणाऱ्या बाबू मेटकरी यांना मोदींच्या एकाच पिल्लाने आलिशान बंगला बांधून दिला आणि जमीन देखील खरेदी करून दिली. माडग्याळ जातीची तशी शेकडो मेंढ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात दिसतात. मात्र यातील जातिवंत मेंढे खूपच कमी आहेत. यातीलच मेटकरी यांचा सर्जा हा मेंढा देशभरात प्रत्येक बाजारात अव्वल येऊ लागल्याने त्याला मोदी हे नामकरण केले होते. याच मोदीचा मेंढा असलेला सोन्या आता पुन्हा चर्चेत आला आहे. तो केवळ दीड वर्षाच्या वयात असून त्याला 55 लाखाला मागणी आल्याने पुन्हा एकदा बाबू मेटकरी चर्चेत आले आहेत .
सहा फूट लांब, मोठा गळा, चंद्रकोरीसारखे नाक असा देखणा सोन्या केवळ दीड वर्षाच्या वयात मोदीप्रमाणे रुबाबदार दिसू लागला आहे. या सोन्याचा खुराक देखील तगडा असून रोज दोन वेळेला लिटरभर दूध , सरकी, मका , ज्वारी , भुईमुगाचे वेल असे या सोन्याचे खाणे आहे . त्याला मोकळ्या मैदानात मेंढ्यांचक्सच्या खांडव्यात भरपूर फिरवले जाते. एखाद्या पोराप्रमाणे बाबू मेटकरी या मेंढ्यांवर माया करतात. मात्र बाबू मेटकरी यांना ही सोन्याची कोंबडी कापायची नाही त्यामुळे त्याच्या अंड्यातच आपण खुश असून सोन्याच्या पिल्लाना देखील सोन्याची मागणी येऊ लागल्याने त्यातून वर्षाला कोटभर रुपये मिळत असल्याचे मेटकरी सांगतात .
सध्या सोन्यापासून झालेल्या नऊ पिल्लांना पाच ते दहा लाखात मागणी येऊ लागल्याने सोन्याला लगेच विकायचे नाही ही त्यांची भूमिका आहे . मेटकरी यांच्याकडे सध्या माडग्याळ जातीच्या इतरही मेंढ्या असून हा खांडवा दीड कोटीला मागितला जातोय. मात्र नुसत्या पैशाचे काय करायचे त्यापेक्षा जातिवंत मेंढ्या तयार करणारा म्हणून जे देशभर नाव मिळाले आहे तेच मोठे करायची मेटकरी यांची इच्छा आहे. तसे मेंढ्याला मोठमोठ्या आलिशान कारपेक्षा जास्त मागणी मिळू शकते हे बाबू मेटकरी यांनी दाखवून दिले होते . आता ते तीच परंपरा जपत असून मोदी जरी गेला तरी त्याच्या पिल्लानाही ते मोदी सारखे बनावट असल्याने मेटकरी यांना या मेंढ्या सोन्याचं अंडे देणारी कोंबडी ठरत आहेत .