(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अनधिकृतपणे पार्क केलेली वाहने ठरतायत अपघातास कारणीभूत; पाच महिन्यात 13 जणांचा बळी
जानेवारी ते 31 मे दरम्यान समृद्धी महामार्गावर पार्किंग केलेल्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे . मात्र तरीही महामार्ग पोलीस आणि परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत.
Samriddhi Highway Accident : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) एरव्ही कायम चर्चेत राहतो तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे (Samriddhi Highway Accident). त्यामागील कारण म्हणजे समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून सातत्याने त्यावर होणारे अपघात यामुळे हा महामार्ग चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र त्यामागील अनेक कारण तपासाअंती पुढे आले असून बेशिस्त आणि नियमांचे उल्लंघन केल्याने सर्वाधिक अपघात (Accident) झाल्याचे समोर आले आहे. उपराजधानी नागपूर ते मुंबईला जोडण्यासाठी सुमारे 55 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करून नागपूर- मुंबई असा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गावरून वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र महामार्गाचे नियम पाळले जात नसल्याने हकनाक नागरिकांचे बळी जाताना दिसत आहे.
अनधिकृतपणे पार्क केलेली वाहने ठरताय अपघाताच कारण
समृद्धी महामार्गावर कुठल्याही वाहनाला थांबण्यास अथवा पार्किंग करण्यास बंदी असतानाही मेहकर जवळील पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतपणे उभारण्यात आलेले फूड स्टॉल आणि त्यामुळे थांबणारी अवजड वाहने, ट्रक्स, कार या समृद्धी महामार्गावरच पार्किंग केल्या जात आहेत आणि त्यामुळे सुसाट वेगाने जाणारी वाहन या पार्किंग केलेल्या वाहनांवर धडकत आहेत. परिणामी त्यामुळेही अपघात होत आहेत.
पाच महिन्यात 13 जणांचा बळी
जानेवारी ते 31 मे दरम्यान समृद्धी महामार्गावर पार्किंग केलेल्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे . मात्र तरीही महामार्ग पोलीस आणि परिवहन विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. समृद्धी महामार्गावर चार लेन्स असून त्यातील सर्वात शेवटची ही इमर्जन्सी लेन असते. मात्र, या इमर्जन्सी लेनवरच ट्रक आणि अवजड वाहने पार्किंग केल्यामुळे अपघात घडल्यास रुग्णवाहिका आणि अग्निशमनच्या वाहनाला जाण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या या वाहनांवर कार किंवा छोटी वाहने धडकून अनेक अपघात झाले.
मात्र अद्यापही परिवहन विभागाला याबाबत सोयर सुतक नाही. संभाव्य धोका लक्षात घेता या कृतीची दखल घेऊन वेळीच नियम अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. आता या गंभीर विषयी प्रशासन नेमकं काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या