साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंची अध्यक्षपदी निवड
साई संस्थान विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरु लागली होती. शिर्डीतून 50 टक्के विश्वस्त नेमण्याची मागणी होती. मात्र आजच्या यादीत 3 जणांना संधी देण्यात आली आहे.
शिर्डी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ लवकरच जाहीर होणार हे निश्चित होतं. त्यावेळी नव्या विश्वस्त मंडळाची यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरु लागली होती. शिर्डीतून 50 टक्के विश्वस्त नेमण्याची मागणी होती. मात्र आजच्या यादीत 3 जणांना संधी देण्यात आली आहे.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ
- आशुतोष काळे- अध्यक्ष
- जगदीश सावंत- उपाध्यक्ष
- अनुराधा आदिक- सदस्य
- सुहास आहेर- सदस्य
- अविनाश दंडवते- सदस्य
- सचिन गुजर- सदस्य
- राहुल कणाल- सदस्य
- सुरेश वाबळे- सदस्य
- जयवंतराव जाधव- सदस्य
- महेंद्र शेळके- सदस्य
- एकनाथ गोंदकर- सदस्य
- शिर्डी नगर पंचायत अध्यक्ष (शिवाजी गोंदकर)- सदस्य
गेल्या 4 वर्षांपासून साईबाबा संस्थानचा कारभार औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीकडून सुरू होता. शिर्डीतील स्थानिक ग्रामस्थ उत्तमराव शेळके यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्या होत्या. महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्षांच्या समन्वय बैठकीत शिर्डी राष्ट्रवादीला तर पंढरपूर काँग्रेसला देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर शिर्डी संस्थानच्या संभाव्य विश्वस्त मंडळाची यादी सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र सरकारने अधिकृत नावांची घोषणा केली असून या यादीत अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येत आहे. अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील 9 जणांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सहकारी राहुल कणाल यांना सुद्धा विश्वस्त पदाची लॉटरी लागली आहे.