(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारने दिलेल्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी नाही : नवाब मलिक
बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैर समज होते ते देखील आता दूर झाले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद बाबत जे काही गैरसमज होते त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहेत. लॉकडाऊनमधे बोकड आणि म्हशी कापताना कोणतीही बंदी नव्हती, आताही बंदी नाही,अशी माहिती नवाब मलिक यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैर समज होते ते देखील आता दूर झाले आहेत. एकदा ऑनलाईन बकऱ्याची नोंद केली की त्यांना घरी ट्रान्सपोर्टशिवाय घरी घेऊन येऊच शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यावं वाहतुकीवर बंदी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हे सर्व विषय ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगल्यावर पोलिसांसाठी सिडकोच्या माध्यमातून चार हजार घरांसाठी अर्ज मागवण्यासाठीच्या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नवाब मलिक, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब उपस्थित होते.
मागील काही दिवसांमध्ये माध्यमांत आगामी पावसाळी अधिवेशन होणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा घडत होत्या. त्याबाबत बोलताना परिवहन मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले की, पावसाळी विधिमंडळ अधिवेशन कधी आणि कसं घ्यायचं या संदर्भात उद्या दुपारी सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पावसाळी अधिवेशनासंदर्भात अंतिम निर्णय होणार आहे. सध्या कोरोना व्हायरसचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे सर्व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उद्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
पोलिसांच्या घरांबाबत बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाचं पोलिसांसाठी राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. सध्या 4466 घरे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला आहे. उद्यापासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात होईल. पोलिसांना कमीतकमी किंमतीत चांगली घरे देण्याचा या योजनेतून प्रयत्न आहे. आगामी काळात देखील पोलिसांसाठी टप्प्याटप्प्याने घरे राखीव ठेवली जातील.
बाळासाहेब थोरात बकरी ईद बाबत बोलताना म्हणाले की, सरकारने बकरी ईद बाबत ज्याकाही सूचना दिल्या आहेत त्यापद्दतीने बकरीईद साजरी करण्यात येईल. बकऱ्यांच्या वाहतुकीबाबत परवानगी आहे. परंतू नागरिकांनी नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे.
Majha Vishesh | बकऱ्यांची कुर्बानी, नियम की मनमानी? सणांना दिसलेलं सामंज्यस्य आता का नाही? ABP Majha