महाराष्ट्रात यूपी मॉडेल आणू नका, गोव्यातून दारुची बाटली आणण्याच्या प्रस्तावित निर्बंधाचा सचिन सावंतांकडून समाचार
Sachin Sawant : गोव्यामधून मद्याची एकही बाटली आणली तर MCOCA लावण्याच्या प्रस्तावाचा सचिन सावंतांकडून समाचार, शासनाच्या 1997 च्या अधिनियमाचा दाखला
Sachin Sawant Slam Shambhuraj Desai : गोव्यातून विनापरवाना एक बाटली दारु आणली तरी थेट मोक्का लावणार, असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिला होता. यावरुन विरोधकांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही शंभूराजे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात यूपी मॉडेल आणू नका, अशी सूचना करतानाच सचिन सावंत यांनी शासनाच्या 1997 च्या अधिनियमाचा दाखला दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यामध्ये खूप स्वस्तात दारु मिळते. दरामध्ये असलेल्या फरकामुळं मोठ्या प्रमाणात गोव्यातून इतर राज्यात तस्करी होत असल्याचं समोर आलेय. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात गोव्यातून दारु येते.
नेमकं काय म्हणाले होते शंभूराजे देसाई -
गोव्यातून विनापरवाना एकजरी दारुची बाटली आणली तर कारवाई करण्यात येणार आहे. एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावण्यात येईल, असे सोमवारी शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे. गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत.
सचिन सावंत काय म्हणाले?
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत शंभूराजे देसाई यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ट्वीटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, 'गोव्यामधून मद्याची एकही बाटली आणली तर MCOCA लावण्याच्या वल्गना करणाऱ्या सन्माननीय शंभूराजे देसाई यांनी राज्य शासनाचे 1997 चे परिपत्रक वाचले आहे का? गोव्यातून एक नव्हे तर दोन बाटल्या आणण्याची मुभा आहे. महाराष्ट्राचा देशात सन्मान आहे तो राखला जावा. यूपी मॉडेल आणू नये ही विनंती.'
या ट्वीटसोबत सचिन सावंत यांनी राज्य शासनाच्या 1997 च्या अधिनियमाचा दाखला दिला आहे. सचिन सावंत यांनी राज्य सरकारचं परिपत्रकही ट्वीटरवर जोडलं आहे.
गोव्यामधून मद्याची एकही बाटली आणली तर MCOCA लावण्याच्या वल्गना करणाऱ्या सन्माननीय @shambhurajdesai यांनी राज्य शासनाचे १९९७ चे परिपत्रक वाचले आहे का? गोव्यातून एक नव्हे तर दोन बाटल्या आणण्याची मुभा आहे. महाराष्ट्राचा देशात सन्मान आहे तो राखला जावा. युपी मॉडेल आणू नये ही विनंती pic.twitter.com/u3awbFNxC4
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 4, 2022
राज्य शासनाचा 1997 अधिनियम काय आहे?
मुंबई दारुबंदी अधिनियम 1949 च्या (1949 चा मुंबई पंचवीस) (ज्याचा यापुढे उल्लेख उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे.) कलम 139 च्या अप कलम (1) चा खंड ( क ) अन्वये शासनास प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन पर्यटक वाहनांमधून गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या भारतीय तसेच परदेशी नागरीकत्वाच्या पर्यटकांना गोव्यात निर्माण होणारे आणि फेणी म्हणून संबोधण्यात येणारे मद्य आणि किंवा वाईन/ वाईन्स आणि ज्यांचे एकत्रिप परिमाण 1500 मिलि पेक्षा जास्त नाही, अशा मद्याची वाहतूक आयात सेवन आणि वापर याबाबतच्या उक्त अधिनियमातील कलम 12 चे उप कलम (क), 13 चे उप कलम (ब) आणि कलम 105 मधील तरतुदींमधून वगळीत आहे.