Russia Ukraine War : युक्रेन रशिया युद्धाचा खाद्यतेलाच्या दरावर परिणाम
Russia Ukraine War : एकीकडे युद्धाचे ढग गडद होत असताना भारतावरही या संभाव्य युद्धाची काळी छाया पडू शकते. याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या घरावर होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे खाद्यतेलच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
लातूर : रशिया युक्रेन युद्धाचा (RUSSIA UKRAINE CONFLICT) परिणाम भारतात देखील जाणवू लागला आहे. भारतातील तेलबिया आणि खाद्यतेलाचे दर वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मागील चार दिवसात सोयाबीनचा दर 1 हजाराच्या आसपास वाढले आहेत. येत्या काही दिवसात ही दरवाढ वाढतच जाणार आहे
दहा हजाराचा पल्ला गाठलेले सोयाबीनचे दर काही काळानंतर पडले होते. अद्याप त्या प्रमाणात दर वाढले नाहीत. यामुळे बाजारात सोयाबीनची आवकवर परिणाम झाला होता. मात्र मागील चार दिवसात दरात काहीप्रमाणात वाढ होत असल्यामुळे आवक वाढली आहे. सोयाबीन चार महिन्यानंतर प्रथमच साडे सात हजार पार गेले आहे. ही दरवाढ होण्यामागे रशिया युक्रेन युद्ध आहे. याच भागात जगातील 60 टक्के सूर्यफूल पिकते. भारतासारख्या देशात 75 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. युक्रेनमधून भारतात मोठ्या प्रमाणावर तेल आयात होते ते आता बंद झाले आहे. जगातील डीओसीची गरज मोठ्या प्रमाणात युक्रेन भागवत होते. सध्या डिओसी येत नाही. ही तूट भागविण्यासाठी सगळे जग भारताकडे वळले आहेत. यामुळे सोयाबीनसह सर्वच तेलबियांना चांगले दर मिळतील अशी आशा आहे.
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 7560 रुपये प्रतिक्विंटल भाव लागला. गेल्या अडीच-तीन महिन्यांमध्ये वाढलेला हा सर्वाधिक भाव असून, या वाढीव भावाचा फायदा त्याच शेतकऱ्यांनाच होणार आहे. ज्यांनी सोयाबीन चार महिने बाजारात आणले नाही. अर्थात मोठे शेतकरी आर्थिक सक्षम असलेले शेतकरी यांना वाढीव भावाचा फायदा होणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्याचे लागवड क्षेत्र कमी त्यांनी सोयाबीन कमी भाव असतानाच विकले आहे. आताही ज्या शेतकऱ्यांना आर्थिक निकड आहे तेच शेतकरी सोयाबीन बाजारात आणत आहेत.
या भाववाढीचा फायदा घेत मागील चार दिवसात 1 लाख क्विंटलपर्यंत माल बाजारपेठेत दाखल झाला आहे. भाववाढ अशात गतीने होत राहिली तर मालाची आवक वाढेल आणि भाव पुन्हा कमी होतील असाही अंदाज बांधला जात आहे. या कारणामुळे बाजारात लवकर माल आणला जात आहे. ही तेजी तीन महिन्यानंतर आली आहे. राज्यात लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीनला कायमच उच्च दर मिळाला आहे.
सोयाबीनच्या दराने 10 हजाराचा पल्ला गाठला होता. तो भाव पुन्हा मिळले ही आशा आता जागी होताना दिसत आहे. उच्चांकी दर पदरात पाडून घ्यावा याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे . ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. त्यांनी सोयाबीन शिल्लक ठेवले आहे. त्याचा लाभ त्यांनी मिळणार आहे.
संबंधित बातम्या:
- Russia Ukraine War : भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधील दूतावासाकडून नवी मार्गदर्शक सूचना जारी
- Share Market: शेअर बाजारात त्सुनामी... दलाल स्ट्रीटवर हाहाकार; Sensex 2,702 अंकांनी कोसळला तर Nifty 16,248 पर्यंत गडगडला
- Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला: शेअर बाजारात गुंतवणूकदार होरपळले; 10 लाख कोटींचा फटका