रशिया-युक्रेन युद्धामुळे भंगारवाल्यांची भरभराट, कवडीमोल भंगार साहित्याला मिळणार आता चांगला भाव
RussiaUkraineWar रशिया व युक्रेन यांच्या युद्धामुळे विदेशातून येणारे स्टील तयार करण्यासाठी येणाऱ्या कच्च्या मालाची आवक कमी झाली आहे. लोह खनिजाचे भाव वाढले आहेत.
यवतमाळ : घरातील भंगार विकायचे म्हटले की, त्याला कवडीमोल भाव यायचा. मात्र, रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामुळे या भंगार साहित्याचे भाव काही दिवसापासून वाढले आहे. याचाच परिणाम म्हणून स्टिलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भंगारवर प्रक्रिया करून त्याचा वापर स्टीलमध्ये होत आहे. याच पार्श्वभूमीवर भंगाराच्या दरात मोठी वाढ झाली आहे. युद्धापूर्वीच्या दरात व आताच्या दरात मोठी तफावत आढळून येत आहे. बाहेर देशातून येणारा कच्चा माल थांबला आहे. त्यामुळे विविध कारखान्यांना लागणारे भंगार अपुरे पडत आहे. यातूनच भंगाराच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
रशिया व युक्रेन यांच्या युद्धामुळे विदेशातून येणारे स्टील तयार करण्यासाठी येणाऱ्या कच्च्या मालाची आवक कमी झाली आहे. लोह खनिजाचे भाव वाढले. छत्तीसगड येथील बेलाडेला येथील खदाणीतून निघणारे लोह खनिज हे अपुरे पडत असल्याने स्टीलची मागणी पूर्ण करण्यासाठी स्क्रॅप (भंगार) याचा 30 टक्क्यांनी वापर वाढला आहे. मागील दोन वर्षात आजपर्यंतचे सर्वात जास्त भाव या काळात गाठले आहे. त्यामुळे भंगाराची मागणी एकदम वाढले आहे. दहा दिवसापूर्वी भंगार लोहा-लोखंडाचे साहित्य 30 रुपये किलो होते. तर आज 38 ते 40 रुपये किलो झाले आहे. टिनटप्पर -20 रुपये किलो होते ते आता 27 ते 30 रुपये किलो झाले आहे. राज्यातील जालना, वर्धा जिल्ह्यातील देवळी, नागपूर , चंद्रपूर आणि रायपूर ठिकाणी लोखंडी सळई निर्मिती होते यासाठी राज्यभरातून व्यापारी हे या कंपनींना भंगार पुरवण्याचे काम करते.
दिवसाला क्विंटल मागे लोखंडी सळई हे पाचशे ते सातशे रुपयाने वाढ होत आहे. या उलाढालीचा फटका लोखंड विक्रेत्यांना बसला आहे. 5400 ते 5600 क्विंटलने विकले जाणारे स्टील (सळई) आता चक्क 8 200 ते 8400 रुपयांवर येऊन थांबले आहे. इमारत बांधकामाच्या इंडस्ट्रीज आर्थिक नाडी मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. इमारत बांधकामासाठी लोखंडी सळईची मागणी कायम असते. लोखंडी सळई हे रायपूर आणि जालना, देवळी, नागपूर येथील बुट्टीबोरी स्टील इंडस्ट्रीज भागवित असते.
दहा दिवसापूर्वीचे आणि आजचे दर
- लोहा-लोखंडाचे साहित्य 30 रुपये किलो आज 35-40 रुपये किलो
- टिनटप्पर -20 रुपये किलो आता 25 ते 30 रुपये
- प्लास्टिक -20-22 रुपये किलो आता 25-30 रुपये किलो
- कार्टून- 8 ते 10 रुपये किलो आता 15 ते 18 रुपये किलो
- रद्दी पेपर- 8 ते 10 रुपये किलो आता 15 ते 18 रुपये किलो असे झाले आहे.
अशी झाली स्टीलची दरवाढ
- 20 फेब्रुवारी -5400 रुपये क्विंटल
- 28 फेब्रुवारी - 7400 रुपये क्विंटल
- 1 मार्च - 7800 रुपये क्विंटल
- 13 मार्च- 8400 रुपये क्विंटल
भंगार लोहा लोखंडचे भाव एकदम वाढल्याने याचा परिणाम स्टीलवर झाला. स्टीलमध्ये क्विंटल मागे तीन ते साडेतीन हजाराने वाढ झाली. याचाच परिणाम घर बांधकामावरती पडलाय. अनेक नागरिकांनी आपलं स्वप्नातील हक्काचं घर व्हावं यासाठी घर बांधकामाला सुरुवात केली. मात्र, अचानक स्टीलचे दर हे वाढल्याने कामे ठप्प ठेवली आहे. तार, खिळे यांचेही दर शंभर रुपये किलोवर जाऊन पोहचले आहे. त्यामुळे पर्यायाने याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर पडला आहे.
देशातील आणि विदेशातील स्क्रॅप खरेदी करून ते वितळवून वेगवेगळ्या प्रकारच्या लोखंडाची निर्मिती केली जाते. लोखंडाचे भाव मुळात बाजारपेठेतील स्क्रॅपवर आणि मागणीवर अवलंबून असते. दरम्यान, विदेशातील कच्चा माल अचानक कमी झाला . तर दुसरीकडे स्क्रॅपचे (भंगार) दर वाढल्याने त्यामुळे देशातील स्टील इंडस्ट्रीज तेजीत आली आहे. राज्यात एका दिवशी जवळपास शंभरकोटीवर स्क्रॅपची (भंगार) उलाढाल होते. हे सर्व भंगार स्टील उत्पादक कंपनीला पुरविण्यात येते.
संबंधित बातम्या :
UP News : स्क्रॅप पॉलिसी लागू करणारे उत्तर प्रदेश ठरले देशातील पहिले राज्य, जाणून घ्या फायदे