महायुती सरकारवरील बदल्यांमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर RSS नाराज; भाजपच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहा, संघाचा सल्ला
विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर संघ आणि भाजपमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. तसेच विशेषता: विदर्भात संघ आणि भाजपमध्ये समन्वय राहायला हवे असे संघाने म्हटले आहे.
मुंबई : महायुती सरकारवर (Mahayuti) बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) नाराजी व्यक्त केली आहे. बदल्यांमुळे महायुती सरकारची प्रतिमा डागाळत असल्याची भावना संघाने व्यक्त केली आहे. भाजपच्या मंत्र्यांनी बदल्यांमधील भ्रष्टाचारापासून दूर राहावं, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर संघ आणि भाजपमध्ये समन्वय असणं गरजेचं असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.
विधानसभेला भाजपला मातृसंस्थेची मोलाची साथ मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या प्रगतीपुस्तकावर मतदारांनी काहीसा असमाधानकारक शेरा मारला. त्यावर भाजपकडून आत्मचिंतन आणि मंथनही सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. आता येत्या दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, भाजप कंबर कसून निवडणुकीसाठी सज्ज झालाय. त्याचाच एक भाग म्हणून संघटनात्मक पातळीवर जोरदार बांधणीही केली जात आहे. त्यासाठी मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही भाजपच्या मदतीसाठी मोठ्या ताकदीने आणि नव्या उमेदीने धावून येणार आहे.
संघाने काय दिला सल्ला?
विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर संघ आणि भाजपमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. तसेच विशेषता: विदर्भात संघ आणि भाजपमध्ये समन्वय राहायला हवे असे संघाने म्हटले आहे. भाजपमधील मराठा, ओबीसी, दलित समाजातील नेत्यांना जबाबदारी वाटून देऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावे अशी भूमिका संघाने घेतली आहे.
निवडणुकीची रणनीती कशी असावी याचा रोडमॅप ठरला
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि रा. स्व. संघात पुरेसा समन्वय साधला गेला नसल्याने त्याचा फटका बसल्याचं बोललं जातंय. तसा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी मागील महिनाभरापासून संघ आणि भाजपच्या एकत्रित बैठका सुरू झाल्यात. याच बैठकांमध्ये निवडणुकीची रणनीती कशी असावी याचा रोडमॅप ठरल्याची माहिती मिळालीय.
अशी आहे संघ-भाजपची रणनीती
- मुंबईसह राज्यभरात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संघ आक्रमक होणार
- तरुण आणि हिंदूत्ववादी चेहऱ्यांकडे महत्वाची जबाबदारी
- लोकसभेत मुस्लिम मतांचा फटका बसला, म्हणून हिंदू मतदारांची जनजागृती करणार
- संघाशी निगडित मात्र काहीसे सक्रिय नसलेल्यांना सक्रिय करणार
- संघ स्वयंसेवक-भाजप पदाधिकाऱ्यांची टीम बनवून विभागवार बैठका
- बैठकांतून मिळालेली माहिती,परिस्थिती पाहून प्रचाराची रणनीती ठरवणार
- महायुती सरकारच्या हिंदुत्ववादी निर्णयांचा प्रचार करणार
- विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला संघ विचारांच्या मदतीने उत्तर देणार
महायुतीला किती फायदा होणार?
महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं नेटवर्क आहे. संघ प्रचारक, संघ शाखा तसेच संघाच्या इतरही सहसंस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलाय. संघाच्या याच सक्रिय नेटवर्कचा भाजपला निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून रा. स्व. संघ भाजपसाठी भक्कमपणे उभा राहतो, हा आजवरचा इतिहास आहे. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. त्याचा महायुतीला किती फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.