मी ईडीला घाबरत नाही, महाराष्ट्रात रामराज्य नाही; रोहित पवारांचा हल्लाबोल
महाराष्ट्रात रामराज्याचा विचार लोकांच्या मनामध्ये आहे. मात्र आज सत्तेत असणारे लोक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत नाहीत . महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला नाही , बेरोजगारीचे प्रश्न सुटत नाहीत, असेही रोहित पवार म्हणाले.
पंढरपूर : ईडीचे (ED) अधिकारी त्यांचे काम करत आहेत , त्यांना लागणारी कागदपत्रे दिलेली आहेत . मात्र आम्ही अडचणीत आलोय किंवा त्यांना घाबरलोय म्हणून देवाकडे आलो नाही. त्यांच्याविरुद्ध लढण्याचे बळ मागण्यासाठी विठ्ठलाकडे आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे. शरद पवार यांचे नातू असणारे रोहित पवार यांच्यामागे सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आज आमदार रोहित पवार हे विठ्ठल दर्शनासाठी आले असून आज होळकर वाड्यातील पुरातन राम मंदिरात आज त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी धाराशिव शुगरचे कार्यकारी अधिकारी अमर पाटील , आदित्य फत्तेपूरकर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राज्यात रामराज्य नसल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
ईडी चौकशीबाबत मोदी सरकारवर टीका करताना आम्ही अडचणीत आलो म्हणणार नाही तर सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे म्हणून देवाकडे आलो आहे . लोकशाहीचा आवाज जे दाबत आहेत त्या ताकतीचा विरोधात लढण्यासाठी मला ताकद द्यावी असा आशीर्वाद विठुरायाच्या घेण्यासाठी मी आलोय असे रोहित पवार यांनी सांगितले.
राज्यात रामराज्य नाही : रोहित पवार
महाराष्ट्रात रामराज्याचा विचार लोकांच्या मनामध्ये आहे. मात्र आज सत्तेत असणारे लोक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत नाहीत . महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला नाही , बेरोजगारीचे प्रश्न सुटत नाहीत. सामान्य लोकांचे कोणी ऐकत नाही त्यामुळे महाराष्ट्रात आज राजकीयदृष्ट्या रामराज्य कोठेही नाही अशी सणसणीत टीका रोहित पवार यांनी केली. रामराज्य आणायचे असेल तर सर्वांना समान अधिकार पाहिजे आणि सामान्य लोकांचे ऐकले जात असेल तर रामराज्य म्हणता येईल पण आज महाराष्ट्रात हे चित्र नसल्याने कोठेही रामराज्य नाही असा टोला लगावला .
विरोधकांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा
या आठवड्यातल्या चारही दिवस विरोधकांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीने चौकशीसाठी बोलावलंय. कथित बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे आणि त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आलीय. तर मंगळवारी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनाही सकाळी 11 वाजता ईडीने चौकशीचं समन्स धाडलंय. जोगेश्वरीतील भूखंडप्रकरणी वायकरांची चौकशी होतेय. बुधवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलंय. बारामती अॅग्रोप्रकरणी ही चौकशी होणार आहे. तर, गुरुवारी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने चौकशीसाठी पाचारण केलंय. कोरोना काळातील कथित बॉडीबॅग प्रकरणी ही चौकशी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या चार दिवसात विरोधकांच्या चार नेत्यांच्या होणाऱ्या चौकशांची रा्ज्याच्या राजकीय तसंच सामाजिक वर्तुळात चर्चा सुरु आहे.
हे ही वाचा :