Rohit Pawar : तब्बल 12 तासांनंतर रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर, कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेरच फटाके फोडले
ED Action On Baramati Agro : बारामती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू असून 1 फेब्रुवारी रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीने निर्देश दिले आहेत.
मुंबई : बारामती अॅग्रोसंबंधित प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे तब्बल 12 तासांनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले आहेत. रोहित पवार बाहेर आल्यानंतर ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ईडीच्या कार्यालयाला लागून असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. 1 फेब्रुवारी रोजी रोहित पवारांनी पुन्हा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर रहावे असे निर्देश ईडीने दिले आहेत.
बारमती अॅग्रो (Baramati Agro) कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. बारामती अॅग्रो कंपनी आमदार रोहित पवार यांच्या मालकीची आहे. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस बजावण्यात आली होती. 19 जानेवारी रोजी रोहित पवारांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावून 24 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
रोहित पवारांवर आरोप काय? (ED Action On Baramati Agro)
कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यावर त्याचा शिखर बँकेने लिलाव केला. या लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता. 50 कोटी रूपयांत बारामती अॅग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकांतले व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आजोबा नातवाचे मागे ठामपणे उभे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचं कार्यालय आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. तसेच आपण ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे आपल्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं. मात्र या वेळी आलेल्या नोटीसीनंतर रोहित पवारांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे रोहित पवारांच्या मागे ठामपणे उभे आहेत.
पवार कुटुंबीय ईडीच्या रडारवर
पवार कुटुंबीय हे या आधीपासूनच ईडीच्या रडारवर आहे. या आधी 2019 साली शरद पवारांना ईडीची नोटीस आली होती. पण त्यावेळी शरद पवारांनी तो ईडीवरच डाव पलटवला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला होता. त्यानंतर अजित पवारांना ईडीची नोटीस आली. अजित पवारांनी नंतर भाजपची साथ दिल्यानंतर आता कारवाई काहीशी थंड पडल्याचं दिसून येतंय. अजित पवार यांच्यानंतर आता रोहित पवार हे ईडीच्या रडारवर असल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा :